गांधीनगर : (Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी हे देखील उपस्थित आहेत.
विजय रुपानी यांच्या परिवाराची घेणार भेट
पंतप्रधान मोदींनी पायी चालत अपघातस्थळाची संपूर्ण पाहणी केली. अधिकाऱ्यांशी भेट झाल्यानंतर पंतप्रधान अहमदाबादमधील सिव्हील हॉस्पिटलमध्येही जाणार आहेत. त्या ठिकाणी दाखल असलेल्या जखमींची भेट घेऊन चौकशी करणार आहेत. यात पंतप्रधान मोदी अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी विश्वास कुमार यांना भेटतील. त्यासोबतच पंतप्रधान मोदी मृतांच्या नातेवाईकांनाही भेटणार आहेत. तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. या विमानात विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. दुर्दैवाने त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर अमित शाह आणि राम मोहन नायडू दोघेही अहमदाबादमध्ये दाखल झाले आणि मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. आता शुक्रवारी पंतप्रधान स्वतः अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघाताशी संबंधित आढावा बैठक घेणार आहेत.