नवी दिल्ली : (Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, मुंबई-लंडन, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क विमानांना मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, एअर इंडियाने एक्सवरील पोस्टद्वारे त्यांची काही विमानं वळवण्यात आल्याची आणि परतल्याची माहिती दिली आहे. एअर इंडियाने म्हटले आहे की "प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या प्रवाशांच्या सोयीसाठी रिफंड व रिशेड्यूलेशन प्रक्रिया सुरू करत आहोत. तसेच आम्ही प्रवाशांना पर्यायी विमानं उपलब्ध करून देत आहोत.
या विमानांचे मार्ग बदलले :
AI130 – लंडन हीथ्रो-मुंबई हे विमान व्हिएन्नाच्या दिशेने वळवले
AI102 – न्यू यॉर्क-दिल्ली हे विमान शारजाहच्या दिशेने वळवले
AI116 – न्यू यॉर्क-मुंबई हे विमान जेद्दाहच्या दिशेने वळवले
AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली हे विमान मुंबईच्या दिशेने वळवले
AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो हे विमान माघारी बोलावले
AI119 – मुंबई-न्यू यॉर्क हे विमान परतले
AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन हे विमान परतले
AI106 – न्यू यॉर्क-दिल्ली हे विमान व्हिएन्नाच्या दिशेने वळवले
AI188 – व्हँकुव्हर-दिल्ली हे विमान जेद्दाहच्या दिशेने वळवले
AI101 – दिल्ली-न्यू यॉर्क हे विमान फ्रँकफर्ट/मिलानच्या दिशेने वळवले
AI126 – शिकागो-दिल्ली हे विमान जेद्दाहच्या दिशेने वळवले
AI132 – लंडन हीथ्रो-बेंगळुरू हे विमान शारजाहच्या दिशेने वळवले
AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली हे विमान व्हिएन्नाच्या दिशेने वळवले
AI104 – वॉशिंग्टन-दिल्ली हे विमान व्हिएन्नाच्या दिशेने वळवले
AI190 – टोरंटो-दिल्ली हे विमान फ्रँकफर्टच्या दिशेने वळवले
AI189 – दिल्ली-टोरंटो हे विमान दिल्लीला परतले
प्रवासी आणि केबिन क्रू यांच्या सुरक्षिततेसाठी एअरलाइनचे मार्ग वळवण्यात आले आहे. जगभरातील वाढत्या संघर्षामुळे एअरलाइन्स कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ड्रोन आणि मिसाइल हल्ले हे प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.