
पुणे : राजकीय बाजू सोडूनसुद्धा आम्ही काही नाती जपतो. मला जर उद्या उद्धव ठाकरेंनी बोलवले तर मी त्यांनादेखील भेटायला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. शुक्रवार, १३ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. यावर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "मनसे आणि उबाठा गट एकत्र आल्यास त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारणात कुणी एकत्र येऊच नये, अशी आमची भावना नाही. राजकीय बाजू सोडूनसुद्धा आम्ही काही नाती जपतो. राज ठाकरे यांच्या घरी मीसुद्धा गेलो होतो. मला जर उद्या उद्धव ठाकरेंनी बोलवले तर मी त्यांनादेखील भेटायला जाऊ शकतो. हा राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला भाग आहे."
"राजसाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनासुद्धा भेटतात आणि ते एकनाथ शिंदेंनासुद्धा भेटतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले म्हणजे संजय शिरसाट पळाले असा अर्थ तुम्ही लावू नका. अजितदादा आणि शरद पवारदेखील भेटतात. या भेटींमध्ये निश्चितपणे राजकीय चर्चा होतात. पण ते सांगण्याचा अधिकार फक्त त्यांनाच असतो," असेही ते म्हणाले.