मुंबई : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता मनसेच्या दोन नेत्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर या दोन्ही नेत्यांनी उदय सामंतांची भेट घेतली.
गुरुवार, १२ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ताज लॅण्ड्स एण्ड हॉटेलमध्ये राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असताना त्याचवेळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी मंत्री उदय सामंतांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीसंदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
उदय सामंतांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "राजसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली, याबाबत मला कल्पना नाही. आमच्याकडे असलेल्या फुलबाजारमधील लोकांची पनवेलमध्ये फुल बाजार हवा, अशी मागणी होती. त्यासंदर्भातील पत्र देण्यासाठी मी उदय सामंत यांच्याकडे आलो होतो. यावेळी यूतीबाबत काहीही चर्चा झाली नाही. माझ्यासारखा लहान कार्यकर्ता कधी यूतीची चर्चा करत नाही. त्यासाठी वरीष्ठ नेते येतात. आजच्या भेटीत यूतीचा विषय नव्हता. आमच्या येथील फुल बाजारमधील लोकांच्या मागणीबाबत बोलण्यासाठी मी आलो होतो," असे त्यांनी सांगितले.