राहुल गांधींना त्यांच्या पक्षातील नेतेही गांभीर्याने घेत नाहीत – गडकरी
12 Jun 2025 17:19:56
नागपूर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘मॅचफिक्सिंग’ केल्याचा आणि गेल्या अकरा वर्षांत केवळ स्वप्ने दाखवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देत, “राहुल गांधी यांचे बोलणे त्यांच्याच पक्षातील नेते गांभीर्याने घेत नाहीत, मग इतरांनी कशाला घ्यावे?”, असा खोचक टोला लगावला.
नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी भाजपच्या ११ वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. “काँग्रेसच्या साठ वर्षांच्या कारकीर्दीत जे जमले नाही, ते आम्ही ११ वर्षांत करून दाखवले. देशभरात रस्त्यांचे जाळे, उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधांमुळे लॉजिस्टिक खर्च १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आला. बंगळुरू आयआयएम, चेन्नई आणि कानपूर आयआयटीच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. डिसेंबरपर्यंत हा खर्च ९ टक्क्यांवर आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले, “आम्ही स्वप्ने दाखवत नाही, तर प्रत्यक्ष कामाची माहिती देतो. भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व आकडेवारी उपलब्ध आहे, विरोधकांनी ती तपासावी. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्नही आम्ही पूर्ण करू.” जनता पुन्हा भाजपवर विश्वास ठेवेल, असा दावाही त्यांनी केला.