बांगलादेशातील रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलोपार्जित घरावर धर्मांध समाजकंटकांचा हल्ला!

12 Jun 2025 13:33:34

ढाका : (Radicals Attack Rabindranath Tagore’s Ancestral Home) बांगलादेशातील सिराजगंज येथील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरावर धर्मांध समाजकंटकांनी हल्ला करुन त्याची तोडफोड केली. यापूर्वीही बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू मुजीबुर रहमान यांच्या घराची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला होता. अंतरिम सरकारप्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत समाजकंटकांचा उन्माद सुरुच असल्याने बांगलादेशात अराजकता वाढत असल्याचे दिसून येते.

समोर आलेल्या माहितीनुसार, तोडफोड करणाऱ्या जमावामध्ये जमात-ए-इस्लामी आणि हिफाजत-ए-इस्लाम या जिहादी संघटनांच्या संबंधित लोकांचा समावेश होता. या समाजकंटकांनी टागोर यांच्याविरुद्ध अपमानास्पद घोषणाही दिल्या आणि एका कर्मचाऱ्याला मारहाण केली, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. या तोडफोडीसंदर्भात पुरातत्व विभागाने एक तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे आणि समितीला पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच वेळी, हे ऐतिहासिक स्थळ तूर्तास बंद करण्यात आले आहे. तोडफोडीची माहिती मिळताच शहजादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोचले; परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. तसेच या प्रकरणी कुणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

https://twitter.com/amitmalviya/status/1933009390476448097

ढाक्यापासून सुमारे १२५ किमी अंतरावर असलेल्या गुरुदेव टागोर यांच्या या दुमजली वडिलोपार्जित घराला संग्रहालयाचा दर्जा देण्यात आला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांनी वर्ष १८४० मध्ये हे घर बांधले होते. वर्ष १९७९ मध्ये बांगलादेशाच्या पुरातत्व विभागाने त्याला संरक्षित इमारतीचा दर्जा दिला.






Powered By Sangraha 9.0