मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

12 Jun 2025 12:56:06
 
museum of Shivaji Maharaj will be built at Rajkot Fort in Malvan
 
मुंबई: (Malvan) मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले, मत्स्यव्यवसाय तथा बंदरविकासमंत्री नितेश राणे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
अजित पवार यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ८३ फुट उंच पुतळ्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या राजकोट किल्ल्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. हा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या भविष्यात वाढू शकते. या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात स्थापन केलेल्या आरमाराचा इतिहास कळावा, माहिती मिळावी, छत्रपतींच्या आरमारापासून आजच्या आधुनिक नौदलाच्या प्रवासाचे दर्शन घडावे, यासाठी राजकोट किल्ला परिसरात भव्य आरमार-नौदल संग्रहालय उभे राहण्यासह परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधीच्या प्रस्तावाचा अभ्यास करुन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रकल्पासाठीची जागा खासगी व्यक्तीकडून अधिग्रहीत करण्याची कार्यवाही चर्चेतून, सामोपचाराने पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
 
बैठकीत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी या संकल्पनेमागचा इतिहास, स्थलवैशिष्ट्ये आणि विकासाच्या दृष्टीने असलेलं महत्त्व सविस्तरपणे मांडलं. समुद्र किनाऱ्यावर ‘शिवस्मृती’ जपणाऱ्या या प्रकल्पामुळे कोकणात धार्मिक-ऐतिहासिक पर्यटनाला नवा आयाम मिळणार आहे, अशी भावना बैठकीतून व्यक्त झाली. या निर्णयामुळे राजकोटचा किल्ला केवळ इतिहासाचा साक्षीदार न राहता, ते एक प्रेरणास्थळ ठरणार आहे. छत्रपतींच्या नौदल परंपरेचा जयघोष या संग्रहालयातून देशभर पोहोचेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
 
संग्रहालयात काय असणार?
 
छत्रपतींच्या आरमाराचा थ्रीडी इतिहास
 
नौदल जीवनावर आधारित इंटरॅक्टिव्ह गॅलरी
 
ऐतिहासिक नौका, शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृती
 
मराठा आरमाराचे प्रसिद्ध जलयुद्ध – दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण
 
आधुनिक भारतीय नौदलाची वाटचाल दर्शवणारे विभाग
 
पर्यटकांसाठी माहिती केंद्र, व्हिज्युअल शो, गाईडेड टूर सेवा
 
 
 
Powered By Sangraha 9.0