दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट

12 Jun 2025 18:48:29

नवी दिल्ली, दिल्ली-एनसीआरसह उत्तर आणि मध्य भारत गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या विळख्यात आहे. देशाची राजधानी दिल्लीत तापमान ४५ अंशांच्या जवळ गेले असून राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये तापमानाचा पारा ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे, जो देशातील सर्वाधिक आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४५ अंशांवर गेला आहे. गुरुवारी दिल्लीत पालम येथे ४४.५ अंश, लोधी रोड येथे ४३.४, दिल्ली रिजमध्ये ४३.६ आणि आयानगर येथे ४५ अंश तापमान नोंदविण्यात आले आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे दिल्लीच्या जनजीवनावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी ७ वाजेपासूनच उष्णतेच्या तीव झळांचा सामना करावा लागत असल्याने दिल्लीकर सध्या घरातच बसणे पसंत करत आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, पश्चिमी विक्षोभामुळे, दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या लोकांना आठवड्याच्या शेवटी उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.



Powered By Sangraha 9.0