मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये भेट
12 Jun 2025 17:07:46
मुंबई, उबाठा आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीच्या चर्चा सुरू असताना, गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये भेट झाली. सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राज ठाकरे सकाळी ९.४० वाजता हॉटेलमध्ये पोहोचले, तर मुख्यमंत्री फडणवीस १०.३५ वाजता तेथे दाखल झाले. विशेष म्हणजे, या भेटीचा उल्लेख फडणवीस यांच्या अधिकृत वेळापत्रकात नव्हता. दोन्ही नेते ११.३५ वाजता हॉटेलमधून बाहेर पडले. या बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत दोन्ही नेत्यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि उबाठा यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस-ठाकरे भेटीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या भेटीचा तपशील आणि उद्देश अद्याप अस्पष्ट आहे.
मनसे नेते उदय सामंतांच्या भेटीला
- मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू असताना, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि नेते अमेय खोपकर यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांची ‘मुक्तागिरी’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर देशपांडे म्हणाले, “पनवेलमध्ये फुलबाजार सुरू करण्याच्या प्रस्तावासाठी उदय सामंत यांची भेट घेतली. युतीच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर होतात, कार्यकर्ते त्यात नसतात. राज ठाकरे आणि फडणवीस भेटीची मला माहिती नाही.”
- मंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, “संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर नवी मुंबईतील विकासकामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होते. शिंदे सह्याद्रीला गेल्याने ते मला आणि श्रीकांत शिंदे यांना भेटले. फडणवीस-ठाकरे भेट आणि आमची भेट हा योगायोग आहे.”