मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवार, १२ जून रोजी भेट घेतली आहे. दरम्यान, या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये राज ठाकरेंची भेट घेतली आहे. गुरुवारी सकाळी राज ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आपल्या ताफ्यासह याठिकाणी दाखल झाले. या दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे पडघम वाजेल. त्यातच राज्यभरात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. उबाठा गटाकडून रोजच यूती करण्यासंदर्भात मनसेला साद घालण्यात येत आहे. मात्र, मनसेने अद्याप त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
त्यामुळे या यूतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आता ही भेट नेमकी कशासाठी होती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.