बीएसएफ जवानांसाठी जुनी ट्रेन पाठवल्याप्रकरणी ४ रेल्वे अधिकाऱ्यांचे निलंबन, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश

12 Jun 2025 12:41:18

नवी दिल्ली : (BSF Jawans Train Controversy) जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेदरम्यान त्रिपुराहून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना तैनात करण्यासाठी जीर्ण अवस्थेतील खराब ट्रेन पाठवल्याप्रकरणी वाद निर्माण झाल्यानंतर, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ११ जूनला चार रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित केले आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात रेल्वे मंत्रालयाने प्राथमिक चौकशीनंतर निष्काळजीपणाबद्दल या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. तात्काळ निलंबित केलेल्या अधिकाऱ्यामध्ये अलीपुरद्वारचे कोचिंग डेपो अधिकारी आणि अलीपुरद्वार विभागाचे तीन वरिष्ठ विभाग अभियंते यांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळ बैठकीच्या ब्रीफिंगमध्ये या मुद्द्यावर चर्चा करताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "कालच यावर कारवाई करण्यात आली. ट्रेनचा रेक बदलण्यात आला. यासाठी जबाबदार असलेल्‌या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सुरक्षा दलाची प्रतिष्ठा आणि आराम ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि अशा प्रकारचा निष्काळजीपणा कोणत्याही पातळीवर खपवून घेतला जाणार नाही."

बीएसएफच्या १२०० जवानांचे एक पथक अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी गुवाहाटीहून काश्मीरला जाणार होते. हे सर्व जवान त्रिपुरातील उदयपूरहून येथून मार्गस्थ होणार होते. त्याच्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनची मागणी करण्यात आली होती.बीएसएफने दोन एसी-२ कोच, द एसी-३ कोच, १६ स्लीपर कोच आणि ४ जीएस/एसएलआर (जनरल स्लीपर एसएसएलआर) कोचची मागणी केली होती. ही ट्रेन त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगालमधील चार ठिकाणी थांबून इतर जवानांनाही आपल्यासोबत नेणार होती. तथापि, त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विशेष ट्रेनवी स्थिती खूपच वाईट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तक्रारीनंतर तात्काळ कारवाई

सुरुवातीला बीएसएफ जवानांनी अशा जीर्ण झालेल्या ट्रेनमधून प्रवास करण्यास नकार दिला. बीएसएफने ही बाब रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. बीएसएफच्या तक्रारीनंतर रेल्वेने तात्काळ कारवाई करत ट्रेन बदलली बदल ट्रेन दिल्यानंतर बीएसएफचे जवान त्रिपुरातील उदयपूर येथून नवीन ट्रेनने अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी रवाना झाले आहेत.



Powered By Sangraha 9.0