मुलुंड कचराभूमी लवकरच मोकळा श्वास घेणार - आतापर्यंत ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण; महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

12 Jun 2025 17:37:11

मुंबई, एकेकाळी कचऱ्याच्या डोंगराखाली दबलेली मुलुंड क्षेपणभूमी आता मोकळा श्वास घेणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या क्षेपणभूमीवरील सुमारे ७ दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी 'बायो-मायनिंग' प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. ऑक्टोबर २०१९ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाने आतापर्यंत ४.८१ दशलक्ष मेट्रिक टन, म्हणजेच तब्बल ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करून ही जागा मोकळी केली आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवार, दि. १२ जून रोजी या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली आणि उर्वरित कचरा जलदगतीने निष्कासित करण्याचे निर्देश दिले. येथील बायो-मायनिंग प्रकल्पाला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. कचरा प्रक्रियेच्या कामाची गती आणि प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रक्रिया कशी चालते?


- मुलुंड क्षेपणभूमीवरील कचरा निष्कासित करून मूळ जागा पुनर्प्राप्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अथक प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुलुंड येथील क्षेपणभूमीवरील सुमारे ७ दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायो-मायनिंग प्रकल्प राबविला जात आहे.

- या प्रकल्पांतर्गत कचऱ्यातील माती, ज्वलनशील पदार्थ तसेच राडारोडा किंवा दगडासारख्या घटकांचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. ऑक्टोबर २०१९ पासून हा प्रकल्प कार्यरत असून याठिकाणी आतापर्यंत ४.८१ दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.

- आयुक्त गगराणी यांनी भेटीदरम्यान मुलुंड क्षेपणभूमीवर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या यंत्रसामग्रीची बारकाईने पाहणी केली. तसेच, कचऱ्यावरील प्रक्रियेबाबतही त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. या प्रकल्पामुळे मुलुंड क्षेपणभूमीचा कचरामुक्त होऊन लवकरच एक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक जागा म्हणून विकसित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


Powered By Sangraha 9.0