विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांचे महत्वपूर्ण निर्देश, म्हणाले...

12 Jun 2025 15:54:05



गांधीनगर : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताच्या दुर्घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर संवाद साधला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह तातडीने गुजरातकडे रवाना झाले आहेत.

गुरुवार, ११ जून रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. दरम्यान, या अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी दिले आहेत.

अहमदाबाद विमान दुर्घटना : माजी मुख्यमंत्री विजय रुपानी विमानात प्रवास करत असल्याची माहिती

मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल म्हणाले की, "अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताची दुर्घटना दुःखदायक आहे. या अपघातात तातडीने बचाव आणि मदतकार्य हाती घेण्याचे आणि जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर त्वरित उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्याचे आणि रुग्णालयात सर्व उपचारांची व्यवस्था प्राधान्याने करण्याचे निर्देशही मी दिले आहेत."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही माझ्याशी बोलून या विमान अपघातात बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ पथके आणि केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती भुपेंद्र पटेल यांनी दिली. दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हेदेखील या विमानातून प्रवास करत होते.
Powered By Sangraha 9.0