स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढणार! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12 Jun 2025 15:11:20
 
Devendra Fadnavis on corporation election
 
मुंबई:  “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाशी युती करावी आणि कोणाशी नाही, हे ठरविण्याचे अधिकार आमचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समितीला आहेत. इतर कोणीही युतीबाबत निर्णय घेऊ शकत नाही. आमची भूमिका या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची आहे. पण, काही जागांवर, जेथे शक्य होणार नाही, तेथे आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ११ जून रोजी दिली.
 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अकोला येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आ. हरिष पिंपळे, प्रकाश भारसाकळे, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, श्याम खोडे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामराव पोकळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधिक्षक अर्जित चांडक आदी उपस्थित होते.
 
अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक निधीच्या विविध २१ विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सिंचन, रस्ते, रूग्णालय सुधारणा, सांस्कृतिक भवन, तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे. पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सुमारे ४५४.६२ कोटी रूपयांच्या निधीतून सिंचनाची व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधनाचा वारसा असलेल्या अकोला भूमीत २४९.४१ कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला.
 
अकोला शहरात अमृत २.० योजनेत ६२९.०६ कोटींच्या निधीतून मलनि:सारण (टप्पा-१) चे काम, तसेच शहरासाठी १८.९९ कोटी निधीतून प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेत ई-बस डेपो व चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे, १५ कोटी रू.निधीतून अद्ययावत सांस्कृतिक भवन, सुमारे ९.९६ कोटी रू. निधीतून ऑलिंपिक दर्जाचा तरणतलावाचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. ‘हायब्रीड ॲन्युइटी’अंतर्गत मुर्तिजापूर-दहिगाव-गुडधी-उमरी- अकोला राज्य महामार्ग २८४, तसेच अकोला-मलकापूर- कानशिवणी-मोरगांव काकड- बोरगांव खुर्द जिल्हा प्रमुख मार्गाची सुधारणा ४१०.१० कोटी निधीतून होणार आहे. त्याचे भूमिपूजन यावेळी झाले. त्याचप्रमाणे, उकळी बाजार-नेर- नांदखेड- किनखेड राज्य महामार्ग २७८, किनखेड ते दहिहंडा महामार्गाची सुधारणा, अकोट मतदारसंघातील राज्यमार्ग क्र.४७ रावेर, पातूर्डा, पिंपळगाव, खांडवी, जळगाव जामोद- हिवरखेड- अकोट या मार्गावरील (रंभापूर ते हिवरखेड ते वारखेड भाग) सुधारणा ३११.४४ कोटी निधीतून होत आहे. बार्शिटाकळी शहरात ९.९९ कोटी निधीतून मुख्य रस्ता होत आहे. या कामांचे भूमिपूजन झाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0