गांधीनगर : (Ahmedabad Plane Crash Updates) गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या विमानात २४२ प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या विमानातील प्रवाश्यांविषयी एअर इंडियाने माहिती दिली आहे.
एअर इंडियाने एक्सवर पोस्ट करत विमानातील प्रवाश्यांविषयी माहिती दिली आहे. "अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघालेल्या या विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अधिक माहिती देण्यासाठी आम्ही १८०० ५६९१ ४४४ हा एक प्रवासी हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे. एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल आणि वेबसाईटवर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती जाहीर करेल", असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी १.४७ वाजता विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर अवघ्या ९ मिनिटांत हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला असून फ्लाईट A1171 चा अपघात झाला असल्याचे त्यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\