अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयाची तातडीची बैठक! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अहमदाबादकडे रवाना

12 Jun 2025 17:38:16



नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघातानंतर नवी दिल्ली येथे नागरी उड्डाण मंत्रालयाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दलची माहिती दिली असून ते अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक आपत्कालीन बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये घटनेचा आढावा घेण्यात आला. तसेच घटनास्थळावरील मदत कार्यावरही चर्चा करण्यात आली. एअर इंडियाच्या AI-१७१ या विमानाचा अपघात झाला असून त्यात एकूण २४२ लोक होते. यात २०० प्रवाशी आणि १२ क्रु मेंबर होते. त्याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेमागे कारण काय आहे, किती नुकसान झाले याबद्दल सध्याच काही सांगता येणार नाही. सर्वात आधी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास आमचे प्राधान्य आहे," असे ते म्हणाले.

ब्रेकिंग! अहमदाबाद विमान दुर्घटनेत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन

ते पुढे म्हणाले की, "केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादला जात आहेत. मी देखील अपघातस्थळी जात आहे. मृतांची नेमकी संख्या निश्चित होण्यास थोडा वेळ लागेल. सर्वात आधी तिथल्या मदतकार्यावर लक्ष देणे आवश्यक असून मी आता घटनास्थळी पोहोचणार आहे. आम्ही तिथल्या राज्य सरकारच्या संपर्कात असून राज्य सरकारच्या सगळ्या आपत्कालीन सेवा तिथे काम करत आहेत," असेही त्यांनी सांगितले.

हेल्पलाईन क्रमांक जारी!
अहमदाबाद येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहे. यात अहमदाबाद येथील विमानतळाचा हेल्पलाईन क्रमांक ०७९२२८६९२११ असून दिल्लीतील एअर इंडियाच्या ऑफिसचा हेल्पलाईन क्रमांक ०११६९३२९३३३ असल्याची माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0