पुणे : राज्यभरात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना शरद पवारांनी याबाबत एक विधान केले आहे. मंगळवार, १० जून रोजी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, "दोन- तीन महिन्यांत निवडणुका येतील. त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातील जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या? एकट्याने लढवायच्या? काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या? याचा विचार वेळ आज आलेली आहे. हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की, आणखी एक मोठी नव्या पिढीची, नव्या नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या- जिल्ह्यांत दिसेल. ते काम आपल्याला करायचं आहे."
"हा पुढचे तीन महिने तुमचं सगळं लक्ष तुमच्या भागामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं? ५० टक्के भगिनींच्या जागेमध्ये कर्तुत्ववान आणि आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या मुली कशा पुढे आणायच्या? या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा. माझी खात्री आहे की, या ठिकाणी राज्याचे नेतृत्व करणारी फळी आहे तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहील. आपण येत्या तीन महिन्यांच्या निवडणुकीनंतर सबंध महाराष्ट्रासमोर नवी नेतृत्व आणू आणि त्यांच्या कर्तृत्वातून इतिहास घडवू," असे ते म्हणाले.
५० टक्के महिलांना निवडून द्या! ते पुढे म्हणाले की, "पहलगामच्या घटनेनंतर जो प्रसंग देशावर आला आणि त्यानंतर जी कारवाई करण्याची वेळ आली त्या कारवाईचे स्वरूप जनतेला सांगण्याचे काम दोन भगिनींनी केले. त्या दोन्ही भगिनी देशाच्या आर्मी, नेव्ही, एअर फोर्स इथे काम करणाऱ्या होत्या. देशाला अभिमान वाटला की, सैन्यामध्ये मुलींना संधी मिळाल्यानंतर जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचे काम भगिनीसुद्धा करतात. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका दोन-तीन महिन्यांवर आलेल्या आहेत. इथे ५० टक्के भगिनींना निवडून द्यायचे आहे. कर्तृत्वाचा मक्ता हा फक्त पुरुषाकडे असतो यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात, संधी दिली पाहिजे. ते आपण अनुभवले. उद्याच्या निवडणुकीमध्ये ५० टक्के जागा भगिनींना द्यायच्या, तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला तर तो यशस्वी करण्याचे काम येत्या दोन- तीन महिन्यांमध्ये आपल्याला करायचे आहे," असेही शरद पवार म्हणाले.