कोकणात 'सह्याद्री संकल्प सोसायटी'च्या माध्यमातून धनेश संवर्धनाचे काम होत आहे. या कामाचा पुढचा टप्पा म्हणजे धनेशाच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे. या टप्प्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. बंगळूरूच्या ‘नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन’ (एनसीएफ) या संस्थेअंतर्गत वन्यजीव संशोधक रोहित नानिवडेकरआणि त्यांची टीम महाराष्ट्रातील सह्याद्रीत अधिवास पुनरुज्जीवनाचे काम करत आहे.त्यांच्या या प्रकल्पाच नाव आहे, 'इकोलाॅजिकल रेस्टोरेशन इन नाॅर्दन वेस्टर्न घाट'. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये विशेषतः दोडामार्ग, कुडाळ आणि संगमेश्वर या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करून प्रदेशनिष्ठ आणि धोक्यात आलेल्या वन्यजीवांसाठी महत्त्वपूर्ण अन्नस्रोत असणाऱ्या स्थानिक वृक्ष प्रजातींची लागवड करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. समाजभिमुख असणारा हा प्रकल्प स्थानिक शेतकरी आणि जमीन मालकांच्या भागीदारीमधून राबवला जात आहे. जमीनमालकाने उदारतेने दिलेल्या जागेमध्ये लावलेल्या झाडांची किमान दोन वर्षे काळजीपूर्वक देखभाल केली जात आहे. जेणेकरून त्यांचे अस्तित्व आणि दीर्घकालीन परिणाम सुनिश्चित होतील.
'एनसीएफ'च्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यात धनेश पक्ष्यांना आवश्यक असणाऱ्या फळझाडांच्या वनीकरणाला सुरुवात झाली आहे. देवरुख येथील स्थानिक रहिवासी अभिजीत पाटील आणि केतकी फाटक या जोडप्याने आपली मोर्डे गावातील जमीन या वनीकरणासाठी देऊ केली आहे. नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत महिनाभर सर्वप्रथम या जमिनीवर यापूर्वी असलेल्या विविधतेची पाहणी करण्यात आली. या वनीकरणामधील सर्वात मोठे आव्हान होते ते झाडांच्या निवडीचे. धनेश खाद्य वृक्ष प्रजातींबरोबर बीज म्हणून नष्ट झालेल्या दुर्मीळ प्रजाती ज्या पूर्वी या भागात होत्या, मात्र आता आढळत नाहीत, अशा झाडांची निवड करण्यात आली. त्यांची रोपे कुडाळमधील मिलिंद पाटील यांच्या 'वेस्टर्न घाट नर्सरी' आणि 'सह्याद्री संकल्प सोसायटी'च्या sacred flora nursery मधून मागविण्यात आली. १० जून रोजी जवळपास ७० प्रजातींची एक हजार रोपे ही मोर्डे गावातील बीज कथा वनात लावण्यात आली. या प्रकल्पाला सह्याद्री संकल्प सोसायटी, सृष्टीज्ञान, ऐएसपी कॉलेज देवरुख, seed stories library यांचे सहकार्य मिळाले आहे.