बंगळुरू(Bangalore Stampede): आयपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी)आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांना थेट जबाबदार धरले, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटक सरकारने बुधवारी, दि. ११ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि आयोजकांनी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण जगाला आमंत्रित केले होते.
या चेंगराचेंगरीसाठी जबाबदार असलेले आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांच्यासह चार व्यक्तींना अटक केली आहे. या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना कर्नाटक सरकारची उडवाउडवीची उत्तरं न्यायालयात पाहायला मिळाली. न्यायमूर्ती एस. आर. कृष्ण कुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
या सुनावणीत राज्य सरकारतर्फे उपस्थित असलेले महाधिवक्ता शशी किरण शेट्टी यांनी न्यायालयाला म्हटले की, या घटनेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जबाबदार आहे, या कार्यक्रमासाठी सुरक्षा, प्रवेशद्वार आणि तिकीट व्यवस्थापनाबाबत आरसीबी आणि बीसीसीआय यांच्यात करार झाला होता, असा युक्तिवाद शशी किरण शेट्टी यांनी केला.
पुढे ते म्हणाले की "असे वाटत होते की त्यांनी संपूर्ण जगाला आमंत्रित केले आहे," त्यांनी आरसीबीच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट न्यायालयाला दाखवल्या, ज्यांमध्ये सर्व चाहत्यांना तिकिट किंवा प्रवेश प्रोटोकॉल स्पष्ट न करता विजय परेडमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले की, स्टेडियममध्ये फक्त ३३,००० लोक बसू शकत होते, परंतु जवळजवळ ३.५ ते ४ लाख लोक गेटवर जमले होते. गर्दीचे व्यवस्थापन करण्यास आम्ही चुकलो अशी कबुली त्यांनी न्यायालयात दिली.
महाधिवक्ता शशी किरण शेट्टी यांनी उडवाउडवीची भाषा करत, न्यायालयाला म्हटले की, स्टेडियममध्ये होणाऱ्या परेड किंवा उत्सव समारंभासाठी कोणतीही अधिकृत परवानगी मागितली गेली नव्हती. "ते परवानगीही मागत नव्हते, तर माहिती देत होते. त्यांनी म्हटले होते की, आम्ही विजय परेडसाठी योजना बनवू'. त्यांनी आधीच ठरवले होते की ते ते करतील," असे ते म्हणाले. आरसीबीचा अंतिम सामना सुरू होण्याच्या फक्त एक तास आधी ३ जून रोजी मिळालेल्या पत्राचा संदर्भ देत ते महाधिवक्ता म्हणाले की, आयोजकांनी किमान सात दिवस आधी मिरवणूक आणि कार्यक्रम परवान्यांसाठी अर्ज न करून कायद्याचे उल्लंघन केले.
पण दुसऱ्या बाजूने, चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे अधिकारी निखिल सोसाळे यांनी न्यायालयासमोर म्हटले की, त्यांची अटक बेकायदेशीर आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सत्कार कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. राज्य सरकारच्या अशा उडवाउडवीच्या उत्तरांमुळे न्यायालयाकडून घटनेची गांभीर्य समजून प्रकरण पुढील सुनावणीपर्यंत तहकूब करण्यात आले.