विवाहबाह्य प्रेमसंबध, ९ तासांचे मर्डर ऑपरेशन; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाचा कसा रचला गेला कट?

11 Jun 2025 18:36:36
 
Raja Raghuvanshi murder case
 
इंदोर : ११ मे रोजी लग्न करून आपल्या पतीला मेघालयात हनिमूनसाठी घेऊन गेलेल्या सोनम रघुवंशीने आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी भाडोत्री गुंडाच्या मदतीने राजा रघुवंशीची हत्या केली. ही हत्या विवाहबाह्य प्रेमसंबधातून झाल्याचे उघड झाले. सोनमने २३ मे रोजी तिचा पती राजा रघुवंशीची हत्या करत त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला. ही हत्या ९ तासांच्या कालावधीत अत्यंत नियोजनबद्धरित्या करण्यात आली.
 
असा रचला गेला कट...
 
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीतून, २३ मे रोजी नवविवाहित जोडपे सकाळी ५.३० वाजता नोंग्रियातमधील शिपारा होमस्टे या हॉटेलमधून बाहेर पडले आणि अर्ध्या तासाने चेरापुंजी येथे ट्रेकवर निघाले. जवळच असणाऱ्या दुसऱ्या होमस्टेमध्ये राहणारे सोनमचे तीन साथीदारही त्याच वेळी बाहेर पडले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सोनम आणि राजा ट्रेक करत असताना आनंद, आकाश आणि विशाल त्यांना भेटले. याचदरम्यान, गुन्हेगारांनी हळूहळू राजाशी ओळख करून घेतली. यातच सोनमने हत्येच्या नियोजनानुसार तिच्या ट्रेकिंगचा वेग कमी केला तर चौघेही पुढे चालत राहिले. अर्ध्या तासानंतर, दुपारी १ ते १.३० च्या आसपास, सोनमकडून हत्येचे संकेत मिळताच विशालने राजाच्या डोक्यावर चाकूने हल्ला केला. आणि आरोपींनी राजाचा मृतदेह रियात अरलियांग येथील वेई सावडोंग पार्किंग लॉटच्या खाली असलेल्या दरीत फेकून दिला.
 
सुरुवातीला हे प्रकरण बेपत्ता झालेले जोडपे म्हणून सुरू झाले, कारण राजा आणि सोनम ईशान्य राज्यात सापडले नाहीत, बेपत्ता असलेल्या आरोपी सोनमचा शोध सुरू असताना, तिने रविवारी रात्री उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या नंदगंज पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आकाश, विशाल आणि आनंद यांना उत्तर प्रदेश व इंदोर शहरातून अटक केल्यानंतर काही तासांतच हत्येचा कट कसा रचला गेला, हे पोलीस तपासात स्पष्ट झाले. याच दरम्यान सोनमचा प्रियकर राजलाही अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, सोनमने ही हत्या करण्यासाठी आरोपींना २० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. एका स्थानिकाने या पाचही जणांना एकत्र पाहिले, ज्याच्या सतर्कतेने पोलिसांना बेपत्ता जोडप्यापासून सुरू झालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास मदत झाली.
 
Powered By Sangraha 9.0