जागतिक मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारताचा जगात दुसरा क्रमांक

11 Jun 2025 17:04:13

India is now at second number in fisheries business worldwide

मुंबई : भारतातील अन्न उत्पादनातील महत्वाचे क्षेत्र म्हणून मत्स्य उत्पादन क्षेत्राकडे पहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या १० वर्षांत देशातील मत्स्य उत्पादन क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ८ टक्के असून, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश बनल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली. देशाच्या मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या काळात देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य उत्पादन क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी मिळाल्याने जागतिक मत्स्यपालनात भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने तब्बल ६० हजार ५२३.८९ कोटी रुपयांचे १७ लाख ८१ हजार ६०२ मेट्रिक टन सीफूड निर्यात केले. यामुळे भारताच्या निर्यात क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

देशाच्या मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री श्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक गती मिळत असून राज्यातील मत्स्योत्पादनामध्ये भरीव वाढ झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे सागरी मत्स्योत्पादन ४ लाख ३४ हजार ५७४ मे. टन इतके होते. सन २०२४-२५ मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकाळात राज्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये २९ हजार १८४ मे.टन ने वाढ झाली असून राज्याचे एकूण मत्स्योत्पादन ४ लाख ६३ हजार ७५८ मे. टन इतके झालेले आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ (सुधारणा-२०२१) अंतर्गत होत असलेली प्रभावी अंमलबजावणी तसेच ड्रोनद्वारे होणारी देखरेख यामुळे राज्यातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सागरी मासेमारी संबंधी सर्वच उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून भविष्यात राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.

Powered By Sangraha 9.0