नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथील त्यांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ‘ऑपरेशन सिंदूर ग्लोबल आऊटरीच’अंतर्गत विविध देशांमध्ये गेलेल्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे स्वागत केले. शिष्टमंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांना वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या बैठकांची माहिती दिली.
केंद्र सरकारने ’ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर जागतिक पातळीवर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर ग्लोबल आऊटरीच’ कार्यक्रमाची आखणी केली होती. त्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगातील विविध देशांमध्ये गेली होती. ही सर्व शिष्टमंडळे आपली मोहीम पूर्ण करून मायदेशी परतली आहेत. या शिष्टमंडळातील नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अनेक देशांचे भारताबाबत असलेले पूर्वग्रह दूर होण्यास मदत झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी या शिष्टमंडळांची भेट घेतली. यावेळी, विविध पक्षांचे खासदार, माजी खासदार आणि प्रतिष्ठित राजनैतिक अधिकार्यांनी विविध राष्ट्रांच्या भेटींमध्ये दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका आणि जागतिक शांततेसाठी वचनबद्धता अधोरेखित केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) सुप्रिया सुळे, काँग्रेस पक्षाचे शशी थरूर, ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, द्रमुकच्या कनिमोळी यांच्यासह विविध खासदार आणि माजी राजदूतांसह सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या सात गटांनी विविध जागतिक राजधान्यांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे भारताचे धोरण, पाकिस्तानचे दहशतवादाचे धोरण आणि भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी विविध देशांना माहिती दिली.