ठाणे- बोरिवली प्रकल्प बोगद्याची लांबी वाढविण्याचा निर्णय बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्यात येणार

11 Jun 2025 18:32:37
Borivali -Thane Tunnel work opposition

मुंबई : ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर येथील पाच इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता. या कामामुळे वाढलेला धुळीचा त्रास आणि दररोज ३०० ते ५०० डंपरच्या वाहतुकीमुळे येथील रहिवाशांनी मुल्लाबाग येथील बोगद्याचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी करत आंदोलन केले होते. रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात येथे मंगळवार,दि.१० रोजी विशेष बैठक घेतली.

या बैठकीला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आणि मुल्लाबाग रहिवाशी संघाचे सदस्य आणि युवासेनेचे नितीन लांडगे हेदेखील उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने मुल्लाबाग रहिवाशी संघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएपेक्स कंपनीच्या आवारात डंपर आणि टिप्परमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे हे काम वेळेत होते की नाही ते पाहण्यासाठी एमएमआरडीएच्यावतीने नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचे निर्देशही शिंदे यांनी या बैठकीत दिले.
 
Powered By Sangraha 9.0