सोलापूर ते गोवा अवघ्या एक तासांत

पंधरा वर्षांपासून बहुप्रतीक्षित तो क्षण आलाच !

    10-Jun-2025
Total Views |
Image




सोलापूर, दि.१०: प्रतिनिधी 
पंधरा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर सोलापूरकरांच्या स्वप्नपूर्ती चा क्षण आला. ६१ सोलापूरकरांनी ऐतिहासिक हवाई प्रवासात सोलापूर ते गोवा असे पहिले उड्डाण घेतले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह सर्व आमदारांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल आणि हरबोला सिद्धेश्वर महाराज की जय अशा जयघोषात सोलापूर विमानतळाहून विमानाने गोव्याकडे उड्डाण केले.

देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्याने आर्थिक विकासाला चालना मिळणार अशी भावना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. सोलापूर विमानतळ येथून फ्लाय 91 विमान कंपनीच्या विमानाला झेंडा दाखवून सेवेचा शुभारंभ करण्यात आला.सोलापूर ते गोवा या विमान सेवेचा शुभारंभ करताना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर विमानतळावरून दुपारी १.१० मिनिटाच्या आसपास विमानाने आकाशात झेप घेतली. सोलापूर ते गोवा हे अंतर अवघ्या तासाभरात पार करत हे विमान गोवा येथील मोपा विमानतळावर उतरले. विमानाचे नियोजित उड्डाण सकाळी दहा वाजताचे असले तरी हवामान खराब असल्यामुळे गोव्याहून विमान येण्यास उशीर झाला. सकाळी साडेआठपासून विमानतळावर दाखल झालेल्या ६१ प्रवाशांमध्ये उशीर होत असला तरी कोणतीही तक्रार केली नाही.

सोलापूरमधून विमानाचे उड्डाण हाच त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. गोव्यावरून सोलापूरला येणारे विमान उतरण्यापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत विमानतळ व्यवस्थापक चंद्रेश वंजारा आणि सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी विमानतळावर सर्व प्रवाशांचे स्वागत केले. प्रवाशांचे औक्षण करण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सर्व प्रवाशांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.