ठाणे : वसई तालुक्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पत पेढ्या, 3 नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती आहेत. परंतु वसई तालुक्यात एकच उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांची वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक १० जून रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार राज्यमंत्री नामदार पंकज भोयर यांची भेट घेऊन लेखी निवेदन द्वारे मागणी केली आहे.
नागरिकांना होणारी गैरसोय दूर व्हावी म्हणून वसई येथील उपनिबंधक कार्यालयाचे विभाजन करून नालासोपारा अथवा विरार येथे एक नवीन उपनिबंधक कार्यालय सुरू करण्यात यावे. आ. राजन नाईक यांचा निवेदनाची तत्काळ दखल घेत माननीय मंत्री महोदयाने प्रधान सचिव सहकार यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आ. राजन नाईक यांनी मंत्री महोदयाचे आभार मानत आशा व्यक्त केली आहे की नागरिकांना होणारी गैरसोय लवकरच दूर होईल. या भेटी दरम्यान आ. राजन नाईक यांचा सोबत जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील व माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील उपस्थित होते अशी माहिती माझी जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.