दोन्ही ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले? मंत्री आशिष शेलार यांचा सवाल

10 Jun 2025 13:47:56
 
minister ashish shelar on thackare
 
मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुंबईसाठी जी कामे केली, त्याचा हिशेब आम्ही कधीही द्यायला तयार आहोत. मात्र, आम्हाला प्रश्न विचारणार्‍यांनी स्वतः मुंबईसाठी काय केले?” असा सवाल दोन्ही ठाकरेंना मुंबई भाजपचे अध्यक्ष मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सोमवार, दि. 9 जून रोजी केला.
 
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील योगी सभागृहात भाजप मुंबईची कार्यशाळा पार पडली. पक्षाची आगामी दिशा, संघटनात्मक बळकटीकरण आणि मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीवर भाष्य करीत मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रदेश महासचिव आ. विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, आ. कालिदास कोळंबकर, आ. प्रविण दरेकर, आ. संजय उपाध्याय, आ. अतुल भातखळकर, आ. अमित साटम, पराग आळवणी, तमिल सेलवन, विद्या ठाकूर, मनिषा चौधरी, माजी खा. गोपाळ शेट्टी, माजी आ. भाई गिरकर, यांच्यासह मुंबईतील खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी तसेच, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व मंडल अध्यक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
अ‍ॅड. शेलार म्हणाले, “श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे आहेत, जे मुंबईत येऊन गणेशोत्सवात गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाले आहेत. मुंबईतील मेट्रो, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, नवी मुंबईतील विमानतळ अशी कितीतरी कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 11 वर्षांच्या काळात झाली. काँग्रेसने धारावीकरांच्या माथी आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून शिक्का मारला होता. तर भाजप हा शिक्का पुसून सर्वांत मोठा पुनर्विकासाचा प्रकल्प म्हणून धारावीचा विकास करीत आहे. मुंबईच्या प्रत्येक विकास कामाला विरोध करणार्‍या उबाठाने आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही मुंबईसाठी काय केले?” असा थेट सवाल मंत्री अ‍ॅड. शेलार यांनी केला.
 
 
Powered By Sangraha 9.0