डहाणू : (Ashok Dhodi Murder Case) तलासरी येथील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला रविवारी ८ जूनला सिलवासा येथून अटक करण्यात आली आहे. अशोक धोडींची ह्त्या करुन पाच महिन्यांपासून फरार झालेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडीचा पोलिसांकडून शोध सुरु होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला दादरा नगर हवेली येथे अविनाश थोडी लपून बसला असल्याची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.
जमिनीच्या तसेच इतर वादातून दारूमाफिया अविनाश धोडी याने आपला भाऊ अशोक धोडी यांचे १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास डहाणू येथून त्यांच्या घरी जात असताना वेवजी घाटात आपल्या साथीदारांसोबत अशोक यांची गाडी अडवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर अशोक यांची हत्या करुन पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह व गाडी गुजरातमधील सरीगाम येथील एका बंद खदाणीत टाकून दिले होते.
अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचा ८ ते १० दिवसांनी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु मुख्य आरोपी अविनाश धोडी हा मयत अशोक धोडी यांचा सख्खा लहान भाऊ असून तो पाच महिन्यांपासून फरार होता. हत्येनंतर तपासासाठी पोलीस चौकीत बोलावले असता अविनाश धोडी हा पोलीस चौकीतून पसार झाला होता. गेल्या पाच महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अविनाश धोडी याला सिलवासा मधील मोरखल येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील एकूण ९ आरोपींचा सहभाग असून त्यापैकी मुख्या आरोपी अविनाश धोडीसह सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अन्य तीन साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.