भारतीय समाज आणि नवे इंग्रजी शिक्षण

10 Jun 2025 21:14:35


भारताच्या शिक्षण क्षेत्रात दोन कालखंड फार मोठे आहेत. ब्रिटिश आगमनापूर्वीचा आणि नंतरचा. ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी भारतीय विचारांचे दर्शन शिक्षणव्यवस्थेतून होत असे. मात्र, ब्रिटिशांनी लादलेल्या व्यवस्थेमध्ये गुण,परीक्षा, पदवी अशा विषयांना अवास्तव महत्त्व आले. त्यामुळे ज्ञानाचे महत्त्व आपसूकच कमी झाले. ब्रिटिशांच्या आगमनानंतर प्रसार झालेल्या नव्या शिक्षण पद्धतीचा घेतलेला हा आढावा...

भारतीय समाजाची ज्ञानपरंपरा ही काही सहस्रके प्राचीन आहे. वेदकाळापासून चालत आलेली ही परंपरा अडीचशे वर्षांपूर्वी ब्रिटिश आक्रमणापर्यंत अव्याहत चालू होती. भारतासाठी परकीय आक्रमण नवीन नव्हते. प्राचीन काळात ‘ग्रीक’, ‘शक-कुशाण-हूण’ इत्यादी समूहांची आक्रमणे आणि मध्य काळात विविध इस्लामी राजवटींची आक्रमणे भारतावर सतत झालेली आहेत. या काळात शिक्षणपरंपरेचा र्‍हास कसा होत गेला, ते आपण पाहिले. परंतु, मूळ व्यवस्थेलाच धक्का लागेल अशी कोणतीही परिस्थिती ब्रिटिश आक्रमणापूर्वी ओढवलेली आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात असे कोणते नेमके बदल घडले, ज्यामुळे आपली शिक्षणपद्धती जवळपास लयाला जाऊन, ब्रिटिश शिक्षणपद्धतीचा उदय झाला ते समजून घ्यायला हवे.


एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या संदर्भात जी सर्वेक्षणे ब्रिटिश ‘ईस्ट इंडिया कंपनी’कडून केली गेली त्यात हे स्पष्टपणे आढळून आले की, भारतीय शिक्षणव्यवस्था ही विकेंद्रित, ग्रामाधारित, स्वयंपूर्ण आणि सर्व समाजघटकांना उपलब्ध अशा प्रकारची होती. जरी या व्यवस्थेच्या शीर्षस्थानी विद्यापीठे असली, तरी तिचे मूळ पाहिल्यास त्यात दोन घटक प्रमुख होते. पहिले म्हणजे विविध गुरुकुलांचे प्रमुख गुरू आणि त्यांच्या परिषदा. समाजातील शिक्षणास योग्य अशा वयातील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम प्राथमिक शिक्षण आणि नंतर प्रत्येकाच्या रुचीनुसार उच्च शिक्षण मिळण्याची व्यवस्था ही गुरुकुले सांभाळत होती. समाजास आवश्यक अशा नवनवीन विद्यांचा अंतर्भाव उच्च शिक्षणात करून शिक्षणाचा योग्य तो स्तर राखणे, ही या गुरुकुलांची जबाबदारी होती. त्याचबरोबर या व्यवस्थेचा दुसरा खांब म्हणजे शिक्षणव्यवस्थेचा आर्थिक भार उचलणारा गृहस्थवर्ग. भिक्षा हा ब्रह्मचार्‍याचा अधिकार आणि गृहस्थाचा धर्म मानला गेल्याने, भिक्षा घेणे हे देण्यापेक्षा श्रेष्ठ मानले गेले. स्वाभाविकच सढळपणे दिल्या गेलेल्या आर्थिक साहाय्याच्या आधारे ही व्यवस्था अविरत चालू राहात असे. ब्रिटिश सत्तेच्या आगमनानंतर या दोन्ही स्तंभांच्या कार्यात कसा बदल होत गेला ते पाहिल्यास, या व्यवस्थेला हळूहळू ब्रिटिश शालेय व्यवस्थेने कसे बाजूला सारले ते आपल्या लक्षात येते.


या सर्व प्रक्रियेत ज्याला ‘भारतीय पुनरुज्जीवन कालखंड’ असे संबोधले जाते, तो नव्या विचारांच्या बंगाली विचारवंतांचा कालखंड महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम भारतात बंगाल प्रांतात ब्रिटिश सत्तेचे आगमन झाले. ‘प्लासी’ आणि ‘बसार’च्या लढायांनंतर इंग्रजांनी जेव्हा बंगाल प्रांतात पाय रोवले, तेव्हा महाराष्ट्रात सातारकर छत्रपतींच्या राज्यात पेशवे अटकेपर्यंत राज्यविस्तार करत होते. मुघल सत्ता खिळखिळी होऊन मराठा साम्राज्याचा पाया घातला गेला होता. त्यामुळे बंगाल जेव्हा नवीन विचारांचा सामना सामरिक पराभवाच्या नंतर करत होता, तेव्हा मराठा साम्राज्याच्या रूपात पश्चिम व दक्षिण भारत राजकीय स्वातंत्र्याचा अनुभव घेत होता. इंग्रजी सत्तेचा पहिला अनुभव हा बंगाल प्रांतात आला असल्याने, इंग्रजी व्यवस्थांना पहिले प्रत्युत्तरही बंगाल प्रांतातून मिळाले. हे प्रत्युत्तर इंग्रजी शिक्षणाचा अनुभव घेतलेल्या बंगाली विचारवंतांकडून आलेले होते. इंग्रजी वसाहतवादाच्या धोरणाला मिळालेले हे पहिले भारतीय प्रत्युत्तर आपल्या आजच्या वैचारिक गुलामीचे मूळ आहे, असे म्हणता येईल. मेकॉलेप्रणित जी शिक्षणव्यवस्था इंग्रज कंपनी सरकारने भारतात राबवली, तिचा उद्देश भारतीय समाजमनापुढे ब्रिटिश समाजव्यवस्था आदर्श म्हणून प्रस्थापित करणे हाच होता. या व्यवस्थेचा परिपाक म्हणून बंगालमध्ये उभ्या राहिलेल्या या पुनरुज्जीवन चळवळीकडे पाहता येईल.


पुनरुज्जीवन (Renessaince) या शब्दाला युरोपच्या धार्मिक इतिहासाच्या चौकटीत एक विशेष अर्थ आहे. ख्रिस्ती पंथाचा आणि त्यातील धर्मगुरूंच्या संरचनेचा समाजावर असलेला पगडा झुगारून देऊन, सर्वच क्षेत्रांत एक नवीन अभिव्यक्ती शोधण्याचा आणि प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न १५-१६व्या शतकात युरोपात झाला, त्यास ‘पुनरुज्जीवन’ म्हणतात. धर्ममतांची चिकित्सा आणि नवीन मते मांडण्याचे स्वातंत्र्य हे या चळवळीचे प्रमुख लक्षण होते. पुनरुज्जीवन कालखंड ते प्रबोधन कालखंड (Enlightenment) या सर्व विचारांमधून युरोपात ख्रिस्ती मताची कठोर चिकित्सा केली गेली आणि धर्मगुरूंचे समाजातील महत्त्व कमी होत गेले. हिंदू धर्मामध्ये याचप्रकारे नवीन चिकित्सा केली जावी, असा प्रयत्न ‘बंगाली पुनरुज्जीवन’ चळवळीतून झाला. हिंदू धर्माची तत्त्वे ख्रिस्ती पंथाप्रमाणे बंदिस्त स्वरूपाची आहेत का? ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संरचनेप्रमाणे हिंदू धर्मात अशी कोणती केंद्रिभूत व्यवस्था आहे का? अशा मूलगामी प्रश्नांचा विचार न करताच, दोन्हीकडे दिसणारी बाह्य उपचारांची साम्यस्थळे केवळ पाहून एक अभूतपूर्व क्रांती आणल्याच्या आविर्भावात ‘बंगाली पुनरुत्थान चळवळ’ उभी राहिली. राजा राममोहन रॉय हे या चळवळीचे जनक म्हणता येतील. स्थिरपद झालेल्या इंग्रजी सत्तेच्या आधारे ख्रिस्ती आणि हिंदू धर्मातील चांगल्या तत्त्वांचा संकर घडवून एक मिश्र संस्कृती निर्माण करावी, असा काहीसा प्रयत्न या बंगाली विचारवंतांचा होता. मात्र, पराभूत मानसिकतेतून घडवलेल्या या संकराचा परिणाम, हिंदू परंपरांकडे हीन दृष्टीने पाहण्यात झाला. मुळात नित्यप्रवाही अशा सनातन हिंदू धर्मास कोणत्याही पुनरुज्जीवनाची आवश्यकता आहे काय, असा प्रश्न कधी विचारलाच गेला नाही. गौतम बुद्ध-शंकराचार्य यांच्यापासून संत तुकाराम-गुरूनानक यांच्यापर्यंत चालत आलेली संतपरंपरा सततच्या पुनरुज्जीवनाचेच निदर्शक होते. परंतु, त्यात निधर्मीवादासारखी भारताला लागू नसणारी युरोपीय तत्त्वे शोधता येत नव्हती. त्यामुळे नवीन राज्यकर्त्यांच्या मताने पश्चिमेकडे तोंड फिरवलेल्या विचारवंतांनी, भारतीय पुनरुज्जीवनाचा ध्यास घेतला. ज्याचा परिणाम स्वाभाविकपणे शैक्षणिक धोरणावरही झाला.


एकापाठोपाठ एक असा सर्व छोट्यामोठ्या भारतीय राजांचा पराभव करून ब्रिटिश सत्ता जेव्हा संपूर्ण भारतावर बसली, तेव्हा ब्रिटिश शैक्षणिक धोरणाचाही अंमल संपूर्ण भारतभर सुरू झाला. परंतु, सुरुवातीस ब्रिटिशांच्या भारतविषयक शैक्षणिक धोरणात दोन गट होते. प्राच्यविद्येचा सखोल अभ्यास असणार्‍या अनेक विद्वानांचे मत हे भारतीय शिक्षणव्यवस्था विशेष न बदलता, त्यात केवळ नवीन पाश्चात्य विद्यांचा अंतर्भाव व्हावा असे होते. संस्कृतवर भर आणि स्थानिक भाषांमध्ये शिक्षण असे त्याचे स्वरूप होते. वेदविद्या आणि अन्य धार्मिक शिक्षणाचाही त्यात अंतर्भाव होता. मेकॉलेप्रणित गटाचे मत मात्र याउलट इंग्रजी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे होते. भारतीय सांस्कृतिक संचितातून शिकण्यासारखे काहीही नाही, असे या गटाचे मत होते. शिक्षणाचा उद्देश हा भारतातील ब्रिटिश राज्य चालवण्यासाठी, ब्रिटिश पद्धती अवगत असलेला कारकून वर्ग निर्माण करणे हा होता. या मतास भारतीय बंगाली विचारवंतांचे अनुमोदन होते आणि ब्रिटिश प्रशासनिक सेवेत मिळणार्‍या नोकर्‍यांचे आर्थिक लाभ पाहता, विद्यार्थी वर्गातही या प्रकारच्या शिक्षणास एक महत्त्व प्राप्त झाले. नवीन पद्धतीत शिक्षणाचे सर्व आयाम हे सरकारच्या हातात जाऊन, समाजाच्या हातात त्याचे कोणत्याही प्रकारचे नियमन उरले नाही. गुरुकुलांचे आचार्य जाऊन त्यांच्या जागी शाळांमधील पगारी शिक्षक आले. अभ्यासक्रम इंग्लंडमध्ये ठरवला जाऊ लागला. परीक्षा पद्धती सुरू होऊन, त्यात उत्तीर्ण झालेल्यांना सरकारी किंवा इंग्रजी कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळू लागल्या. सुरुवातीस अशा शाळांमध्ये शिकवण्यास भारतीय शिक्षक उपलब्ध नसल्याने,इंग्रज शिक्षक नेमले गेले. भारतीय मनात गुरूला असलेल्या एका विशिष्ट स्थानामुळे या नवीन गुरूंना आणि त्यांच्या आचरणाला आदर्श मानले जाऊन, हळूहळू पाश्चात्य आदर्श ठेवणारा एक समाजगट निर्माण झाला. राज्यकर्त्यांशी असलेल्या जवळीकीमुळे या वर्गाकडे अधिक सुबत्ता होती आणि या वर्गात प्रवेश करणे हे सामाजिक ध्येय बनले. हळूहळू पारंपरिक गुरुकुले नष्ट होत, सरकारच्या शाळाखात्याने चालवलेल्या शाळा संपूर्ण भारतभर पसरल्या.


यात पुन्हा बदल होऊ लागला तो एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. काही पिढ्यांच्या इंग्रजी शिक्षणानंतर भारतात एक असा वर्ग निर्माण झाला, जे स्वतः शिक्षित होते आणि त्यामुळे अशा शाळांमध्ये शिकवण्यास पात्र होते. सरकारी शाळांमध्ये अशा भारतीय शिक्षकांची भरती सुरू झाली होती. परंतु, संपूर्ण शिक्षणसंस्थाच आपल्या हातात असाव्यात असा विचार करून, अनेक ठिकाणी राष्ट्रीय विचारांच्या शाळा सुरू झाल्या. टिळक प्रभृतींनी सुरू केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’सारख्या संस्था, शाळा व महाविद्यालये स्थापन करू लागल्या. या संस्थांचा प्राथमिक उद्देश हा इंग्रजी शिक्षण देणे हाच असला, तरी आपल्या देशविषयी प्रेम आणि समाजाविषयी आत्मीयभाव निर्माण करणे, हा अशा संस्थांचा प्रयत्न होता. याच काळात टिळकांनी त्यांचे ‘राष्ट्रीय शिक्षण’ आणि गांधी यांनी त्यांचे ‘नई तालीम’ या विषयातील विचार मांडले. इंग्रजी शिक्षणातून प्रसृत होणार्‍या वैचारिक दास्याचा धोका ओळखून, भारतीय तत्त्वांशी सुसंगत अशा शैक्षणिक रचनेची आवश्यकता अनेक विचारवंत मांडू लागले. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात असे अनेक प्रयोग स्थानिक पातळीवर करण्यात आले. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या कल्पनेतील विद्यालय शांतिनिकेतन येथे स्थापन केले. मदनमोहन मालविय आणि अ‍ॅनी बेझंट यांनी ‘बनारस हिंदू कॉलेज’च्या माध्यमातून हिंदू तत्त्वांच्या आधारे, पाश्चात्य आणि पौर्वात्य विद्यांचा संगम करणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.


परंतु, यातील कित्येक विचार केवळ सैद्धांतिक पातळीवरच राहून त्यांचे कोणतेही प्रत्यक्ष उपयोजन, दुर्दैवाने भारतीय समाजात होऊ शकले नाही. वैचारिक दास्यातून शिक्षणाविषयी आलेल्या उपयुक्ततावादी दृष्टिकोनाने इंग्रजी पद्धतीच्या शासनप्रणित, ठराविक पुस्तकी अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धती असलेल्या आणि ज्ञानाऐवजी पदवी प्राप्त करणे एवढेच लक्ष्य असलेल्या शिक्षणास, आजही समाजात मान्यता आहे. वैचारिक गुलामगिरीतून मुक्तता प्रदान करणारे शिक्षण मिळवण्यासाठी या शिक्षणाच्या व्यवस्थेलाच बदलण्याची असलेली आवश्यकता, हा चक्रीय प्रश्न आज आपल्यापुढे आहे.


डॉ. हर्षल भडकमकर
९७६९९२३९७३
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)


Powered By Sangraha 9.0