लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! भाडेवाढ न करता एसी ट्रेन...

10 Jun 2025 16:19:04

मुंबई : लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी भाडेवाढ न करता एसी ट्रेन आणण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंब्रा येथील रेल्वे अपघाताची घटना अतिशय गंभीर आहे. काल रेल्वेमंत्र्यांनी जवळपास पाऊण तास माझ्याशी चर्चा केली. त्यांनी अडचणी काय आहेत, उपाययोजना काय आहेत ते समजावून सांगितले. उपनगरी रेल्वेवरही सर्वात जास्त गुंतवणूक मोदी सरकारच्या काळात झाली. लोकलला दरवाजे लावले तर व्हेंटीलेशनची व्यवस्था करावी लागेल हे सरकारलाही माहिती आहे. कालची घटना ही गंभीरच आहे. आपले मेट्रोचे नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळे उपनगरीय रेल्वेमध्ये अजूनही गर्दी आहे. त्यामुळे जास्तीच्या ट्रेन कशा आणता येतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे. भाडे न वाढवता मोठ्या प्रमाणात एसी ट्रेन देण्याची योजना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी आखली आहे. कालच्या घटनेतून आपल्याला काही गोष्टी शिकून त्या प्रकारचे काम करावे लागणार असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्याचे प्लॅनिंग करतील," असे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत! संकल्पाकडून सिद्धीकडे जाणारी मोदी सरकारची ११ वर्षे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ते पुढे म्हणाले की, "लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळत बदल करण्यात आला आहे. मात्र खाजगी आस्थापनांमध्ये ते करणे थोडे कठीण आहे. कारण ते त्यांच्या नफ्याचा विचार अधिक करतात. परंतू, यात आणखी काही करता येईल का, हा आपला प्रयत्न असेल. तसेच सार्वजनिक वाहतूकीसंबंधी पायाभूत सुविधा कशा वाढवता येतील याचा विचार करण्यात येईल," असेही त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0