ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला असून यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, याप्रसंगी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्यादेखील केल्या आहेत.
अविनाश जाधव म्हणाले की, "गेल्या १५ वर्षांत ५१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ८ हजार लोकांच्या केसेस मागच्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यांना सरकारकडून काहीतरी मदत मिळावी. ठाणे रेल्वे स्थानकावर १० बाथरूम आहेत. ते सगळे बंद आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर गरज नसताना स्टॉल वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे आल्यावर चेंगराचेंगरील होते. सगळ्यांना एकत्र करून स्वतंत्र मुंबई रेल्वे बोर्डची स्थापना व्हावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.