मुंबई: संयुक्त राष्ट्रांच्या प्रसिद्ध झालेल्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार, २०२५ अखेरपर्यंत भारताची लोकसंख्या ही १.४६ अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारत हा आता जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल, जिथे आता जवळपास १.५ अब्ज लोकसंख्या आहे. आता हीच संख्या सुमारे सुमारे १.७ अब्ज होण्याची अपेक्षा आहे. असे संयुक्त राष्ट्रांच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात लोकसंख्येची रचना, प्रजनन क्षमता आणि आयुष्मानतील महत्त्वाचे बदल देखील स्पष्ट करण्यात आले आहेत. जे भारतातील लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाचे संकेत देणारे आहेत. अहवालात असेही आढळून आले आहे की, भारताचा एकूण प्रजनन दर प्रति महिला १.९ जन्मांपर्यंत कमी झाला आहे, जो २.१ च्या बदली पातळीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की सरासरी भारतीय महिलांना एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत लोकसंख्या राखण्यासाठी गरजेपेक्षा कमी मुले होत आहेत. हा जन्मदर कमी होत असला तरी, भारतातील तरुणांची संख्या ही लक्षणीय आहे ज्यात ०-१४ वयोगटातील २४ टक्के, १०-१९ वयोगटातील १७ टक्के आणि १०-२४ वयोगटातील २६ टक्के असे प्रमाण आहे.
"भारताने प्रजनन दर कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. १९७० मध्ये प्रति महिला सुमारे पाच मुलांवरून आज दोन मुलांपर्यंत हा रेट आला आहे. यामुळे माता मृत्युदरात मोठी घट झाली आहे. तरीही भारतातील विविध राज्ये, जाती आणि उत्पन्न गटांमध्ये अजूनही असमानता कायम आहे. सुधारित शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या उपलब्धतेमुळे हे शक्य झाले आहे." असे युएनएफपीए इंडियाच्या प्रतिनिधी अँड्रिया एम वोज्नार म्हणाल्या. "लोक संख्याशास्त्रीय अधिकार आणि आर्थिक समृद्धी एकत्रितपणे कशी प्रगती करू शकते हे दाखवण्याची भारताकडे एक अद्वितीय संधी आहे," असेही वोज्नार म्हणाल्या.