जैविक पदार्थांची तस्करी करणाऱ्या चिनी महिला संशोधकाला अमेरिकेत अटक! एफबीआयकडून सलग दुसऱ्यांदा कारवाई

10 Jun 2025 15:43:07

Biological smuggling US arrests Chinese scientist linked to Wuhan lab
 
 
वॉशिंग्टन डी.सी. : (Biological Smuggling) अमेरिकेत जैविक सुरक्षा व्यवस्थेवर धोका निर्माण करणाऱ्या आणखी एका प्रकाराने खळबळ उडवली आहे. चीनमधील वुहान येथील हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करत असलेल्या चेंग्झुआन हॅन या महिला संशोधकाला अमेरिकेत जैविक पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एफबीआयने ८ जून रोजी डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन विमानतळावर ही कारवाई केली.
 
हे वाचलंत का? - टीएमसी खासदार साकेत गोखलेंनी मागितली माजी राजदूत लक्ष्मी पुरी यांची जाहीर माफी! नेमकं काय म्हणाले?
 
एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून या घटनेबद्दल माहिती दिली. त्यांनी नमूद केलं की, “डेट्रॉईटमध्ये आणखी एका चिनी नागरिकाला जैविक साहित्याची तस्करी व खोटी माहिती दिल्याप्रकरणी अटक झाली आहे. हॅन ही वुहान येथील पीएचडी संशोधक असून ती मिशिगन विद्यापीठात एक वर्ष संशोधनासाठी येणार होती.”
 
एफबीआयच्या तपासानुसार, चेंग्झुआन हॅनने चीनहून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील काही प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या नावाने चार पॅकेजेस पाठवली होती. या पॅकेजेसमध्ये परोपजीवी राउंडवर्म व विशिष्ट प्रकारच्या हानीकारक बुरशीशी संबंधित जैविक घटक होते. हे जैविक पदार्थ अमेरिकी कायद्याने नियंत्रित घटक म्हणून ओळखले जातात, आणि त्यासाठी विशेष सरकारी परवाना आवश्यक असतो.
 
 
 
विशेष म्हणजे, हॅनने या घटकांबाबत चुकीची माहिती दिली होती आणि एका पॅकेजमध्ये जैविक पदार्थ पुस्तकात लपवून पाठवला होता. तिने सुरक्षा अधिकाऱ्यांकडून विचारणा झाल्यावरही पॅकेजेसची माहिती नाकारली आणि तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, अमेरिकेत येण्यापूर्वी हॅनने आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील डेटा पुसल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात एफबीआयने न्यायालयात स्पष्ट केलं आहे की, हॅनने धोकादायक जैविक घटक बेकायदेशीरपणे अमेरिकेत आणले आणि त्याबद्दल खोटी माहिती दिली. यामुळे तिच्यावर जैविक तस्करी आणि फसवणूक प्रकरणी दोन गंभीर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
महत्त्वाचे म्हणजे, गेल्या आठवड्यात मिशिगनमध्ये आणखी दोन चिनी नागरिकांना अशाच प्रकारच्या जैविक तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरही धोकादायक बुरशीच्या तस्करीचा आणि कृषी दहशतवाद पसरवल्याचा आरोप आहे. या केवळ गुन्हेगारीच्या घटना नसून आंतरराष्ट्रीय जैविक सुरक्षेसाठी मोठा इशारा आहे. चीनकडून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने अमेरिकन यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
 
जैविक पदार्थाच्या तस्करीमुळे मोठा धोका
 
जैविक पदार्थाची तस्करी म्हणजे सरकारची परवानगी न घेता विषाणू, जिवंत सूक्ष्मजीव (बॅक्टेरिया), डीएनए व अन्य जैविक घटक लपवून किंवा चुकीची माहिती देऊन एका देशातून दुसऱ्या देशात नेणे. अशा प्रकारच्या तस्करीमध्ये आजार पसरवण्याचा धोका असतोच, त्याचबरोबर जैविक शस्त्र वापरण्याचा धोका असून यामुळे शेती, अन्नसाखळी, पर्यावरण यांना हानी पोहोचण्याची शक्यता असते.
 
Powered By Sangraha 9.0