तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरुप बदलले!

01 Jun 2025 18:25:38
तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरुप बदलले!
रत्नागिरी : "आधुनिकीकरण आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरुप बदलेले आहे. समाज माध्यमांमुळे मोठमोठ्या घडामोडी कळतात. बातम्यांचा प्रभाव इतका असतो की, राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते. हे सर्व होत असताना राज्यकर्त्यांकडून चांगले काम करून घेण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असते", असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दि. ३१ मे आणि १ जून अशा दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, कोकण विभागाच्या माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यासह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, कोकणातील पत्रकारितेमध्ये वेगळी क्षमता आहे. कोकणातील पत्रकारांना बाळशस्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांचा वारसा आहे. हिंदी पत्रकारितेचे जनक बाबूराव पराडकर हे देखील कोकणातलेच. मी स्वत:ला सुदैवी मानतो कारण माझा जन्म या भूमीत झाला आहे आणि मी सध्या या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पत्रकारितेचे जन्मस्थान असलेले कोकण आम्ही कसे विकसीत केले, कसे जपून ठेवले आहे, हे महाराष्ट्रातील सर्व पत्रकरांनी पहावे यासाठी पुढील कार्यशाळा ही संपूर्ण राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

माझ्या ३० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत माझे काम जनतेपर्यंत नेण्याचे महत्त्वाचे काम हे पत्रकारांनी केले आहे. हे माझ्या अपरोक्ष पत्रकारांनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आहेत. त्यामुळे मला पत्रकारांबद्दल आत्मियता आहे. कोकणचा विकास संपूर्ण महाराष्ट्राने पहावा, त्याची प्रसिध्दी करावी. या माध्यमातून परदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने कोकणात पर्यटनासाठी यावे, यासाठी अशी कार्यशाळा राज्यभरातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0