मुंबई : ( indian navy Shoot-to-kill orders) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातील किनारपट्टीलगत गस्त वाढवण्यात आली आहे.
संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे. ‘सागरी कवच’ ही व्यापक तटरक्षक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
तसेच मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये, यासाठी मच्छीमार बोटींच्या ये-जा करण्याच्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली आहे.
‘शूट-टू-किल’चे आदेश
- समुद्रमार्गे होणाऱ्या घुसखोरीवर अरबी समुद्रात करडी नजर ठेवण्यात येत आहे. समुद्रात मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छिमारांनी दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच ‘ऑफशोअर डिफेन्स एरिया’मध्ये मच्छिमारांना मासेमारी करता येणार नसून, त्या क्षेत्रात बोट आढळल्यास थेट ‘शूट-टू-किल’चे आदेश देण्यात आले आहेत.
- तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, पोर्ट ट्रस्ट, मेरिटाईम बोर्ड आणि सागरी किनारा पोलीस अलर्ट मोडवर आहेत. किनारपट्टी भागात गोपनीय पद्धतीने गस्त घालण्यात येत आहे. खास करून रात्रीच्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीच्या ‘लँडिंग पॉईंट’वर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.