‘वाडा चिरेबंदी’ ला अमेरिकेत जोरदार प्रतिसाद

09 May 2025 14:48:30

good response in America to Wada Chirebandi marathi play
 
मुंबई: ( good response in America to Wada Chirebandi marathi play ) प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांनी एकमुखाने गौरवलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला अमेरिकेतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सध्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा अमेरिका दौरा सुरू असून या अभिजात कलाकृतीच्या समारोपाचे प्रयोग मे महिन्यात अमेरिकेत होतायेत.
 
या दौऱ्यातील प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दि. ९ मे वॉशिंग्टन डिसी, दि. १० मे डेट्रॉईट, दि. ११ मे शिकागो, दि. १६ मे ऑस्टीन, दि. १७ मे डलास, दि. १८ मे लॉस एन्जलीस, दि. २३ मे सॅन डियागो आणि दि. २५ मे सॅन जोसे. येथे पुढील प्रयोग होणार आहेत.
 
बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ त्यासोबत बदलते नातेसंबंध असा भावभावनांचा भव्यपट रंगमंचावर बघणं म्हणजे आम्हां नाट्य रसिकांसाठी पर्वणीच होती, अशा शब्दांत अमेरिकेतील नाट्यरसिकांनी या नाट्यकृतीचे कौतुक केले. अमेरिकेत अनेक संस्था मराठी नाटकांचे आयोजन करतात.
 
त्यांच्या या उत्साहाला प्रतिसाद देत रंजनाचा आनंद त्यांना द्यावा या भावनेने आम्ही हे समारोपाचे प्रयोग अमेरिकेत सादर केल्याचे निर्माता, दिग्दर्शकांनी सांगितले. अमेरिकेत स्थायिक असलेले शैलेश शेट्ये आणि प्रमोद पाटील यांच्या 'फाईव्ह डायमेन्शन्स' या संस्थेने हा दौरा आयोजित केला आहे.
 
'जिगीषा-अष्टविनायक' निर्मित, महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'वाडा चिरेबंदी' नाटकात निवेदिता सराफ, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, राजश्री गढीकर, धनंजय सरदेशपांडे, विनिता शिंदे, अजिंक्य ननावरे, सिमरन सैद आणि वैभव मांगले व प्रसाद ओक या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर या नाटकाचे निर्माते आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0