व्हिएतनामचे गूढ बंदर

09 May 2025 22:51:35
व्हिएतनामचे गूढ बंदर

व्हिएतनामच्या अवतीभवती असलेली हजारो खडकाळ बेटे, याच बेटांमधून हिरवळीने सजलेल्या मार्गातून क्रूझचा प्रवास होतो. या सागरी निळ्याशार पाण्याने नेत्रदीपक अशालाँग आंतरराष्ट्रीय क्रूझ पोर्टवर येऊन सर्व क्रूझ विसावतात. येथूनच पर्यटक ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या जुन्या वास्तू पाहून आश्चर्यचकित होतात. ‘लाँग आंतरराष्ट्रीय क्रूझ पोर्ट’ खाडी आणि बेटावरील गूढ सौंदर्यामुळे जगभरासाठी आकर्षणाचा विषय झाले आहे. हे पोर्ट जागतिक प्रवाशांना व्हिएतनामच्या नैसर्गिक सौंदर्याशी जोडत आहे.


व्हिएतनाममध्ये जाणारे पर्यटक हवाईमार्गासहित समुद्री मार्गाचाही पर्याय निवडू शकतात.हे पोर्ट युनेस्कोच्या नैसर्गिक वारसास्थळांपैकी एक आहे. 2018 मध्ये े उघडल्यापासून या पोर्टने प्रादेशिक पर्यटनात लक्षणीय कामगिरी केली आहे. ’बे चाय पर्यटन क्षेत्रा’च्या मध्यभागी रणनीतिकदृष्ट्या स्थित हे अत्याधुनिक बंदर, अंदाजे 43.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह विकसित केले गेले. दहा हजारांहून अधिक प्रवाशांना वाहून नेणार्‍या आधुनिक क्रूझ जहाजे उभी करण्याची क्षमता याची आहे.

हे पोर्ट व्हिएतनामचे पहिले समर्पित आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आहे. 785 मीटर लांबीचा, 10.5 मीटर रुंदीचा गँगवे थेट आंतरराष्ट्रीय टर्मिनलला जोडतो. हे टर्मिनल 462 मीटर लांब आहे आणि एकाच वेळी दोन मोठ्या क्रूझ जहाजांना सामावून घेते. चार बर्थ असलेल्या या टर्मिनलमध्ये दररोज 200-300 प्रेक्षणीय बोटींचे संचलन होते. या सेवेचा लाभ 15 हजार प्रवाशांना मिळतो. हे पोर्ट व्हिएतनामच्या जागतिक क्रूझ प्रवास कार्यक्रमांसाठी एक महत्त्वाचे कनेक्शन पॉईंट आहे. कोस्टा सेरेना, सेलिब्रिटी सॉल्स्टिस आणि नूरडॅम यांसारख्या शीर्ष क्रूझ लाईनर्समध्ये, आता या पोर्टचाही समावेश आहे.

उत्कृष्ट कार्यक्षमतेसोबतच हे बंदर एक उत्तम वास्तुशिल्पाचा नमुनादेखील आहे. या बंदराचे टर्मिनल जगप्रसिद्ध वास्तुविशारद बिल बेन्सली यांनी डिझाईन केले होते. या बंदराचे वास्तुशिल्प इंडोचाईन प्रेरणा आणि जुन्या युरोपीय जहाजाचे स्वरूप यांचे मिश्रण आहे. याचा परिणाम म्हणजे आतमध्ये सुंदर कोरीवकाम, प्रशस्त सभागृह आणि ऐतिहासिक सोनेरी प्रकाशयोजना आहेत. प्रगत तंत्रज्ञानाद्वारे इमिग्रेशन प्रक्रिया सुलभ केली आहे. सूर्यास्तावेळी या बंदराला मनमोहक रुपडे प्राप्त होते. सूर्यास्ताची सोनेरी किरणे खाडीतील चुनखडी शिखरांच्या मागे पडल्याचेे दृश्य पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

क्रूझ बंदराने कार्यक्षम व्यवस्थापनामुळे आणि प्रेक्षणीय स्थळांच्या पर्यायांमुळे पर्यटकांचा अनुभव समृद्ध केला आहे. चार तासांच्या क्रूझमध्ये थिएन कुंग गुहा, दौ गो गुहा, ट्रोंग माई आयलेट आणि बा हँग फिशिंग व्हिलेज यांसारख्या प्रतिष्ठित स्थळांना भेट दिली जाते. ज्यामध्ये कयाकिंग आणि बांबू बोट राईड्स यांसारख्या उपक्रमचाही समावेश आहे. सहा तासांच्या प्रवास कार्यक्रमात सुंग सोट गुहा आणि पॅनोरॅमिक शिखर दृश्यांसाठी आणि नितळ समुद्रकिनार्‍यांसाठी ओळखले जाणारे टिटोप बेट, असे थांबे समाविष्ट आहेत. यामध्ये रात्रीच्या थांब्याचाही समावेश आहे. इथे प्रवासी रात्रीच्या चांदण्यांचा आनंद घेत, सूर्याची पहिली कोवळी किरणे अंगावर घेत जागे होतात. या खाडी आणि क्रूझ प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असतो. या बंदरावरून पर्यटक जवळील आकर्षणेदेखील बघू शकतात, ज्यात सन वर्ल्ड हा लाँग, क्वांग निन्ह संग्रहालय आणि वुई फेस्ट नाईट मार्केट यांचा समावेश आहे. हाय-स्पीड बोट सेवा या लाँगला ’है फोंग’ आणि ’को टू’ आयलंडशी जोडतात, ज्यामुळे नजदीकचा प्रवासही जलद होतो.

वर्ष 2025 मध्ये हे बंदर अंदाजे 70 क्रूझ जहाजांचे संचालन करण्याचा अंदाज आहे यामुळे या बंदरात 90 हजार आंतरराष्ट्रीय पर्यटक येतील. 2024च्या एकूण 76 हजार पर्यटकांच्या तुलनेत यावर्षी 1.3 पट वाढ नोंदवण्याचा अंदाज आहे. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यांत, जागतिक स्तरावरील 11 क्रूझ जहाजांवरून सुमारे 15 हजार प्रवाशांना इथे भेट दिली आहे. यावर्षीच्या वेळापत्रकात मेन शिफ 6, सेलिब्रिटी सॉल्स्टिस यांसारख्या जागतिक दर्जाच्या जहाजांचाही समावेश आहे. विशेषतः नोव्हेंबरमध्ये, आठवड्यातून तीनवेळा चीनमधील बेहाई येथून क्रूझ येतील. प्रगत पायाभूत सुविधा, कार्यक्षम सेवा आणि प्रमुख किनारी स्थानासह, ’हा लाँग आंतरराष्ट्रीय क्रूझ बंदर’ हे केवळ हा लाँग बेचे प्रवेशद्वार नाही, तर प्रवाशांना व्हिएतनामच्या सांस्कृती आणि पर्यटनाशी जोडणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

Powered By Sangraha 9.0