सिंधू जलकरार स्थगिती : पाकिस्तानला जागतिक बँकेकडून मोठा दणका!

09 May 2025 17:53:11
 
Pakistan gets big blow from World Bank
 
नवी दिल्ली: ( Pakistan gets big blow from World Bank ) भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू जलकरारात सूत्रधार असण्यापलीकडे जागतिक बँकेची भूमिका नाही, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी सांगितले. त्यामुळे आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाणी वाटप करारावर लादलेल्या स्थगितीच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँक हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा हे गुरुवारी दिल्लीत होते. त्यांनी राष्ट्रीय राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच जागतिक बँक या प्रकरणात हस्तक्षेप करेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, बंगा यांनी सिंधू जलकराराविषयी जागतिक बँकेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सुविधा देण्यापलिकडे जागतिक बँकेकडे अन्य कोणतीही भूमिका नाही.
 
जागतिक बँक कशी हस्तक्षेप करेल आणि समस्या कशी सोडवेल याबद्दल माध्यमांमध्ये बरीच अटकळ आहे, पण ती सर्वच गोंधळलेली आहे. जागतिक बँकेची भूमिका केवळ सुविधा देणाऱ्याची आहे, असे बंगा यांनी स्पष्ट केले आहे.
भारत आणि पाक यांच्यात नऊ वर्षांच्या वाटाघाटींनंतर १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मदतीने सिंधू जल करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यामध्ये मध्यस्थाची भूमिका जागतिक बँकेने बजावली होती. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित केला आहे. त्यानंतर पाकने जागतिक बँकेकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0