बंगाल क्लबकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३ लाखांचे अर्थसहाय्य
09-May-2025
Total Views |
मुंबई: ( Bengal Club donates Rs 3 lakhs to Chief Minister Relief Fund ) शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबच्या वतीने नुकताच वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात दोन दिवसीय ‘बंगा संस्कृती उत्सव – २०२५’ संपन्न झाला. या सांस्कृतिक महोत्सवातून जमा झालेला निधी समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगात आणावा, या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तीन लाख रुपये देणगी स्वरूपात देण्यात आले आहेत. देणगीचा धनादेश समाजसेवा अधिक्षक श्रीकांत केकान यांना सुपूर्द करण्यात आला.
शंभर वर्षांहून अधिक काळापासून बंगाल क्लब धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करत असून सामाजिक बांधिलकीही तेवढ्याच ताकदीने जपत आहे. हाच वारसा पुढे नेत, यंदाच्या बंगा संस्कृती उत्सवातून जमा करण्यात आलेला निधी कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात आला. या दोन दिवसीय महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१९ एप्रिल रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थिती दर्शविली. त्यांनी क्लबच्या सामाजिक उपक्रमांचे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेल्या देणगीचे विशेष कौतुक केले. प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांनीही क्लबच्या उपक्रमांचे आणि देणगीविषयी कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.
बंगाल क्लबने आपली सांस्कृतिक ओळख जपत सामाजिक उत्तरदायित्वही जपले आहे. या देणगीमधून कर्करोगग्रस्त व गरजू रुग्णांच्या उपचारास मदत होणार आहे. क्लबच्या या उपक्रमामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते. क्लबचा हा पुढाकार इतर संस्थांसाठीही आदर्श ठरणार आहे.