मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Baluchistan against Pak Army) भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील बंडखोरांनीसुद्धा पाकिस्तानी सैन्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केलीय. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने ताब्यात घेतल्याची माहिती उघडकीस येत आहे. बीएलए आर्मीने असा दावा केला की, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले. सध्या पाकिस्तानी सैन्याने शहराच्या अनेक भागांतील नियंत्रण गमावले असून बीएलएने गॅस पाइपलाइन उडवल्याचा दावा केला आहे.
हे वाचलंत का? : सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या सात दहशतवाद्यांना कंठस्नान!
फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयासह प्रमुख लष्करी प्रतिष्ठानांजवळ स्फोट आणि गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) खैबर-पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहे. गेल्या काही दिवसांत टीटीपीच्या हल्ल्यांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. यासोबतच भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवरही हल्ला केला. पाकिस्तानने जेव्हा जम्मू, पठाणकोट, उधमपूरसह भारतातील अनेक शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्याची बातमी आली. भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडला आणि लाहोर, इस्लामाबाद आणि रावळपिंडीसह अनेक पाकिस्तानी शहरांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले.
याचदरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये बीएलएने बोलन भागात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या एका गस्त पथकाला लक्ष्य करत रिमोट-कंट्रोल्ड आयईडी स्फोट वापरून लष्कराचे वाहन उडवून दिले होते. या हल्ल्यात १२ पाकिस्तानी सैनिक मारले गेले.