मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (BSF Action Sambha Sector) भारत-पाकिस्तान सीमेवरील जम्मू फ्रंटियरच्या सांबा सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न बीएसएफने शुक्रवारी पहाटे उधळून लावला. या कारवाईत सात दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. बीएसएफने एका निवेदनाद्वारे या माहितीला दुजोरा दिला आहे. बीएसएफच्या म्हणण्यानुसार, धांधर चौकीवरून पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबाराच्या आडून दहशतवाद्यांच्या एका मोठ्या गटाने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तथापी बीएसएफच्या तुकडीने हा प्रयत्न यशस्वीपणे उधळून लावला.
मिळालेल्या माहितीनुसार, घुसखोरांशी झालेल्या चकमकीत धंधार चौकीचे मोठे नुकसान झाले. ३,३२३ किमी लांबीच्या भारत-पाकिस्तान सीमेचे रक्षण करणाऱ्या बीएसएफने धंधार येथील पाकिस्तानी चौकीच्या विध्वंसाची थर्मल इमेजर (HHTI) क्लिप देखील जारी केली. अशी माहिती आहे की, या कारवाईच्या एक दिवस अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व सीमा रक्षक दलांच्या महासंचालकांशी चर्चा केली होती.