नवी दिल्ली :(Attacks on 15 Indian cities) ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने दि. ६ मे च्या मध्यरात्री पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या ठिकाणावर केलेला हवाई हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने सिमावर्ती भागात केलेल्या गोळीबाराने जवळपास १८ जम्मू आणि कश्मीरच्या स्थानिकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय सुरक्षेशी कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आंतर-मंत्रालयीन सचिवांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
दरम्यान, पाकिस्तानने एकूण १५ शहरांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला असून भारताने तो हाणून पाडला. ज्यात अवंतीपुरा, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंडीगड, नल, फलोदी, उत्तरलाई, भुज आदी शहरांचा सामावेश आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा तयारी आणि आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. पंतप्रधानांनी विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कामकाजाची सातत्य आणि संस्थात्मक समन्वय राखण्यासाठी भर दिला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
पंतप्रधान मोदीनी सचिवांना त्यांच्या संबंधित मंत्रालयांच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेण्याचे निर्देश दिले. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद आणि अंतर्गत संवादावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. आपआपल्या विभागाचे कामकाज सुनिश्चित करण्याचे निर्देश संबधित सचिवांना दिले आहेत. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये नागरी संरक्षण यंत्रणा मजबूत करणे, चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्रालयांना राज्य सरकारच्या विविध विभागाशी आणि स्थानिक संस्थांशी समन्वय राखण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. या बैठकीत कॅबिनेट सचिव, पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण, गृह व्यवहार, परराष्ट्र व्यवहार, माहिती आणि प्रसारण, ऊर्जा, आरोग्य आणि दूरसंचार यासारख्या प्रमुख मंत्रालयांचे सचिव उपस्थित होते.