अमेरिकेत भारतीयांचा डंका

    08-May-2025
Total Views |
अमेरिकेत भारतीयांचा डंका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये साहजिकच भारतीयांचाही सहभाग होताच. पण, तरीही भारतीय समुदाय हा अमेरिकेतील आशियाई स्थलांतरितांमधील दुसरा सर्वांत मोठा समुदाय. विशेष म्हणजे, ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अमेरिकेतील भारतीय समुदााची विविध वैशिष्ट्ये, पैलू समोर आले आहेत. त्यावरुन अमेरिकेतील सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक परिघातही भारतीय समुदायाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित व्हावे.


अमेरिकेलाच आता आपले घर मानलेले सुमारे 5.2 दशलक्ष भारतीय वंशाचे लोक आहेत. म्हणजेच अमेरिकेतील एकूण आशियाई लोकसंख्येच्या सुमारे 21 टक्के संख्या ही भारतीय-अमेरिकन नागरिकांची असल्याचे ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या ‘अमेरिकन कम्युनिटी सर्व्हे’च्या आकडेवारीनुसार दिसून येते. या अहवालानुसार, यामध्ये अशा लोकसंख्येचा समावेश आहे, जे स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबाचे मूळ भारतीय आहे. भारतातून स्थलांतरित आणि अमेरिकेत किंवा इतरत्र जन्मलेल्या लोकांचाही यात समावेश आहे. गेल्या 20 वर्षांत स्थलांतर आणि लोकसंख्यावाढीमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या संख्येतही वाढ नोंदवण्यात आली. अमेरिकेतील पहिल्या क्रमांकावरील आशियाई समुदाय हा चिनी नागरिकांचा. त्यांची संख्या ही 5.5 दशलक्षच्या घरात. मात्र, गेल्या काही वर्षांत चिनी विद्यार्थ्यांना मागे टाकत भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेतील संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. 2023-24 साली अमेरिकेत उच्च शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 23 टक्के वाढ झाली असून, ही संख्या आता 3 लाख, 31 हजार, 602 इतकी आहे. तसेच 2021-23 साली अमेरिकेत सुमारे 4.9 दशलक्ष असलेल्या भारतीय-अमेरिकन लोकसंख्येत सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे. 2000 सालापासून, अमेरिकेतील भारतीय लोकसंख्येत अंदाजे 3.1 दशलक्षांनी वाढ झाली असून, ही वाढ सुमारे 20 वर्षांच्या कालावधीत 1.8 दशलक्षांवरून 174 टक्क्यांवर पोहोचली आहे.

भारतीय स्थलांतरितांच्या एका महत्त्वपूर्ण लोकसंख्येने अमेरिकेत दीर्घकालीन मुळे प्रस्थापित केली आहेत, त्यापैकी 60 टक्के लोक एका दशकाहून अधिक काळ अमेरिकेत वास्तव्यास आहेत आणि 51 टक्के लोकांनी नैसर्गिक पर्यायांनी अमेरिकन नागरिकत्व मिळवले आहे. अमेरिकेत पाच वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या भारतीयांपैकी 84 टक्के लोक इंग्रजीत अगदी प्रभावीपणे संवाद साधू शकतात. तसेच अमेरिकन-भारतीयांपैकी 28 टक्के लोक घरी फक्त इंग्रजी भाषेत बोलतात आणि 56 टक्के लोक घरी दुसर्‍या भाषेत संवाद साधतात. कौतुकास्पद बाब म्हणजे, अन्य आशियाई अमेरिकन लोकांच्या तुलनेत, भारतीयांचा इंग्रजी भाषेतील प्रवीणतेचा दर हा अधिक आहे.

भारतीय समुदाय हा तसा संपूर्ण अमेरिकेत विखुरलेला असला, तरी लोकसंख्येचा एक महत्त्वाचा भाग कॅलिफोर्निया राज्यात राहतो, जिथे अंदाजे 9 लाख, 60 हजार लोक वास्तव्यास आहेत. भारतीय लोकसंख्या असलेल्या इतर राज्यांमध्ये टेक्सास (5 लाख, 70 हजार), न्यूजर्सी (4 लाख, 40 हजार), न्यूयॉर्क (3 लाख, 90 हजार) आणि इलिनॉय (2 लाख, 70 हजार) यांचा समावेश आहे. तसेच भारतीय-अमेरिकन लोकांपैकी निम्मे लोक हिंदू आहेत.

एकूणच काय तर भारतीय समुदाय हा अमेरिकेत सर्वच बाबतीत आघाडीवर दिसून येतो. भारतीय समुदायाने आपल्या हिमतीने, ताकदीने अमेरिकेत आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. म्हणूनच एक मेहनती, प्रामाणिक आणि महत्त्वाचे म्हणजे विश्वासू समुदाय म्हणून भारतीयांकडे बघितले जाते. परंतु, गेल्या काही काळातील अमेरिकेतील हिंदूंवरील हल्ल्यांच्या, मंदिरांच्या, मूर्तींच्या विटंबनांच्या घटना या सर्वस्वी चिंताजनक आहेत. त्यामुळे भारतीय समुदायाला अमेरिकेत सुरक्षित वाटावे, यासाठी ट्रम्प सरकारनेही योग्य ती पाऊले उचलायला हवी. भारत हा जगातील उगवती ‘सॉफ्ट पॉवर’ आहेच आणि त्यात अमेरिकेतील भारतीयांचा असा हा सिंहाचा वाटा!

विजय कुलकर्णी