मुंबई : पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइंड होता. तो देखील ह्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला.
आयसी-८१४ कंधहार हायजॅकमध्ये रौफ अझहरची भूमिका महत्वाची होती. या अपहरणाच्या बदल्यात अल-कायदाचा प्रमुख दहशतवादी उमर सईद शेख याची सूटका करुन द्यावी लागली. २००२ मध्ये त्याने ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’चे अमेरिकन-ज्यू पत्रकार डॅनियल पर्ल यांचे अपहरण करून हत्या केली होती. यात रौफ अझहरचा मोठा हात होता. डिसेंबर १९९९ मध्ये हरकत-उल-मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांनी हे विमान अपहरण केले आणि तालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानात नेले. काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे आयसी-८१४ अपहरण करणाऱ्यांमध्ये अब्दुल रौफ अझहरचाही हात होता.