श्रीनगर: (Pakistan Firing Across LOC) पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने गेले १२ दिवस सुरु ठेवलेले शस्त्रसंधी उल्लंघन बुधवारी अधिक तीव्र केले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरुन पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
नियंत्रण रेषेवरील (Line of Control) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरुन पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात पुंछ, तंगधार आणि नियंत्रण रेषेजवळच्या गावांमधील १८ भारतीय नागरिकांचा बळी गेला असून यात चार लहान मुलांचाही समावेश आहे. तर ५७ नागरिक जखमी झाले आहेत. या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय सैन्याकडूनही जोरदार देण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याने पूंछ जिल्ह्यातील गुरुद्वारावरही हल्ला केला,ज्यात तीन शीख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेत गुरुद्वाराचेही मोठे नुकसान झाले आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमेवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुंछ जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी निवारा केंद्रंही उभारली आहेत. येथे लोकांना राहण्याची, जेवणाची आणि वैद्यकीय मदतीची सोय करण्यात आली आहे. तसेच सद्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहाता जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ येथील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी दिले आहेत.