पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या सचिवांची उच्च स्तरीय बैठक

08 May 2025 17:23:53


Meeting of government officials under authority of prime minister


नवी दिल्ली
 :
 राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत चिंताजनक ठरलेल्या अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सज्जता तसेच आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग यांच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, परिचालनातील सातत्य तसेच संस्थात्मक लवचिकता राखण्यासाठी सरकारची सर्व मंत्रालये तसेच संस्था यांच्या दरम्यान अखंडित समन्वयाच्या गरजेवर अधिक भर दिला. सध्याची स्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयांनी केलेले नियोजन आणि तयारी यांचा त्यांनी आढावा घेतला. सर्व सचिवांनी आपापल्या संबंधित मंत्रालयाच्या परिचालनाचा व्यापक आढावा घ्यावा तसेच सिद्धता, आपत्कालीन प्रतिसाद तसेच अंतर्गत संवादविषयक नियमावली यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करून अत्यावश्यक यंत्रणांचे कार्य निर्दोष पद्धतीने होत आहे, याची सुनिश्चिती करून घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यमान परिस्थितीत संपूर्णतः सरकारच्या दृष्टीकोनासह केलेल्या नियोजनाचे तपशील सचिवांनी यावेळी सादर केले.

बैठकीत विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये इतर अनेक मुद्द्यांसह नागरी संरक्षण यंत्रणेचे मजबुतीकरण, चुकीची माहिती तसेच अफवा यांना अटकाव करण्याचे प्रयत्न यांसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता सुनिश्चित करणे इत्यादी घटकांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकार तसेच मुलभूत पातळीवरील संस्थांशी उत्तम समन्वय राखण्याच्या सूचना देखील मंत्रालयांना देण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिव, पंतप्रधान कार्यालयातील ज्येष्ठ अधिकारी तसेच संरक्षण, गृह व्यवहार, परराष्ट्र व्यवहार, माहिती आणि प्रसारण, विद्युत, आरोग्य आणि दूरसंवाद यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयाचे सचिव सदर बैठकीला उपस्थित होते.

देश सध्या एका संवेदनशील स्थितीमध्ये असताना सातत्यपूर्ण सतर्कता, संस्थात्मक समन्वय आणि स्पष्ट संवाद यांचा स्वीकार करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. राष्ट्रीय सुरक्षा, परिचालनात्मक सज्जता आणि नागरिकांची सुरक्षितता यांच्याप्रती सरकारच्या बांधिलकीची त्यांनी पुन्हा एकदा ग्वाही दिली.


Powered By Sangraha 9.0