सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आयटीआयच्या' हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
- मंत्री लोढा यांनी आयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा
08-May-2025
Total Views |
मुंबई : ( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत.
या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो, याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे श्री. लोढा म्हणाले. त्याचबरोबर या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयटी आयमध्ये सहा नव्या अभ्यासक्रमाची यावेळी घोषणा केली. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई व्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.
दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील मंत्री यांचे विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन लाभले. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली.
राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉ. लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय हे विद्यार्थ्यांना सांगितले. या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदतकार्य याचे प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे. मानव निर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थिनींनी सादर केली. राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती. एस. एस. माने यांनी यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.