नवी दिल्ली :(Expression on Operation Sindoor) ‘ऑपरेशन सिंदूर’ ही दहशतवाद्यांच्या अंताची सुरुवात असावी, अशी अपेक्षा लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांनी व्यक्त केली आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारावाईनंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.
दि. २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात हुतात्मा झालेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल म्हणाल्या की "माझे पती संरक्षण दलात होते आणि त्यांना देशात शांतता राखायची होती, या देशाची सुरक्षा करायची होती. येथील निष्पाप लोकांच्या जीवांचे रक्षण करायचे होते. त्यांना देशातील द्वेष आणि दहशत संपवायची होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल, मी सरकारचे आभार मानते, परंतु मी त्यांना विनंती करते की त्यांनी हे ऑपरेशन येथेच थांबवू नये. जोपर्यंत दहशतवादाच्या खात्मा होत नाही, ही तर दहशतवादाच्या समाप्तीची सुरुवात आहे.", असे त्या म्हणाल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव अगदी बरोबर!
लेफ्टनंट विनय नरवाल यांचे वडील राजेश नरवाल म्हणाले की, या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव देणे अगदी बरोबर दिले आहे. दहशतवाद्यांनी आमच्या मुली आणि बहिणींच्या पतींची त्यांचा धर्म विचारून निर्घृण हत्या केली. ते म्हणाले की, या ऑपरेशनमुळे दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन मिळेल.
इतर मृतांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या मंजुनाथ राव यांची आई सुमती यांनी भारतीय सैन्याच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.त्या म्हणाल्या की, भारतीय सैन्याने आणि पंतप्रधान मोदींनी योग्य वेळी, योग्य पद्धतीने उत्तर दिले आहे.त्या पुढे म्हणाल्या, "मंजुनाथ आमच्याकडे परत येणार नाही, परंतु या ऑपरेशनमुळे आमच्या कुटुंबाला शांती मिळाली आहे."
केरळमधील कोची येथील आरती मेनन, ज्यांचे वडील एन. रामचंद्रन हे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारलेल्या लोकांपैकी एक होते, त्या म्हणाल्या की आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे,सिंदूर हे भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते आणि ऑपरेशन सिंदूर हे सरकार आणि सैन्याच्या माध्यमातून दहशतवाद्यांना योग्य उत्तर आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांपैकी एक शुभम द्विवेदी यांचे वडील संजय द्विवेदी यांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणावर ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल भारतीय सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले “ऑपरेशन सिंदूरची बातमी ऐकल्यापासून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हलके वाटत आहे. त्यांनी असेही म्हटले की भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये फोफावणाऱ्या दहशतवादाचा नाश केला पाहिजे.