अलौकिक बुद्धिमत्तेचे वॉरेन बफे यांनी वयाच्या 93व्या वर्षी निवृत्तीची घोषणा करत, संपूर्ण जगाला चकित केले. आर्थिक युगातील त्यांनीच लिहिलेल्या एका भल्यामोठ्या समृद्ध अध्यायाला त्यांनी यशस्वीपणे पूर्णविराम दिला. आर्थिक शिस्तीचे धडे संपूर्ण जगाने ज्यांच्याकडून घेतले, त्या बफे यांच्या जीवनातील अर्थचिंतन...
जगभरात ‘ओमाहा वाईज’ म्हणून ओळखले जाणारे मृदुभाषी त्याचवेळी अलौकिक बुद्धिमत्तेचे वॉरेन बफे यांनी अखेर निवृत्तीची घोषणा केली आणि संपूर्ण जगात त्यांची चर्चा झाली. वयाच्या ९३व्या वर्षी ‘बर्कशायर हॅथवे’ या अब्जावधी डॉलर्स मूल्य किमतीचे साम्राज्य सोडत, त्यांनी निवृत्ती पत्करली असून, आर्थिक युगातील एका मोठ्या अध्यायाला त्यांनी स्वतःसाठी आपल्या हाताने यशस्वीपणे पूर्णविराम दिला. त्यांच्या जागी आता ग्रेग अॅबेल यांच्याकडे सूत्रे सुपूर्द होणार असली, तरी हा प्रश्न केवळ व्यक्तीच्या बदलाचा नाही, तर एका विचारपद्धतीच्या अखेराचा आहे, हे लक्षात घ्यायला लागेल.
वॉरेन बफे म्हणजे केवळ गुंतवणूकदार नव्हते. ते गुंतवणुकीचे तत्त्वज्ञ होते. ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ ही संकल्पना त्यांनी केवळ अमलात आणली असे नाही, तर तिचा विस्तार करत एक नवा समृद्ध आर्थिक दृष्टिकोन निर्माण केला. बेंजामिन ग्रॅहम यांच्या ‘द इंटेलिजन्स इन्व्हेस्टर’ या ग्रंथाचा मूर्तिपूजक असलेला हा माणूस जगाला शिकवत गेला की ‘भावनांऐवजी विवेक, आणि वेगाऐवजी संयम’ हेच दीर्घकालीन यशाचे गमक आहे आणि त्यांनी आपल्या वाटचालीतून ते सिद्धही केले. रूल नंबर 1-‘नेव्हर लूज मनी.’ रूल नंबर 2-‘नेव्हर फरगेट.’ रूल नंबर 1 हे त्यांचे विधान संपूर्ण जगात आजही चर्चिले जाते. हे केवळ त्यांचे विधान नव्हते, तर ती त्यांनी जगलेली जीवनशैली होती.
बफे यांनी १९६५ साली ‘बर्कशायर हॅथवे’ या एकेकाळच्या डबघाईला आलेल्या वस्त्रोद्योग कंपनीत गुंतवणूक केली. पुढे त्यांनी तिचे रूपांतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अजस्र संस्थेत बनवले. त्यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीने ‘जीईआयसीओ’, ‘कोका-कोला’, ‘अमेरिकन एक्सप्रेस’, ‘अॅपल’, ‘मुडीज’, ‘क्राफ्ट हेंज’ यांसारख्या कंपन्यांत मोठ्या प्रमाणावर हिस्सेदारी घेतली. बफे यांनी ज्या-ज्या कंपन्यांत गुंतवणूक केली, त्यांनी यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत केली. म्हणूनच, बफे यांच्या शब्दाला महत्त्व आले. हे सर्व करताना त्यांनी शेअर बाजाराच्या लगेचच परतावा देणार्या फायद्यामागे धावण्याऐवजी संयम, सखोल मूल्यविश्लेषण आणि दीर्घकालीन दृष्टी या तत्त्वांना प्राधान्य देत गुंतवणूक करण्याचे धोरण अवलंबले आणि ते कमालीच यशस्वी ठरले. बफे यांचे कर्तृत्व केवळ आर्थिक यशापुरते मर्यादित नसून, त्यांनी लाखो तरुण गुंतवणूकदारांना शिकवले की, अल्पश्रमात आणि अल्पकालावधीत श्रीमंती हे भ्रामक स्वप्न आहे. त्याऐवजी त्यांनी अशी शिकवण दिली की, शिस्तबद्ध गुंतवणूक, साधे जीवन आणि नीतिमत्तेवर आधारित निर्णय हेच तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतील. त्यांचे सहयोगी चार्ली मंगर (ज्यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले) यांच्या सोबतीने बफे यांनी अनेकदा सांगितले की, “नेमकेपणाने गुंतवणूक करणे हे फार जटिल नसून आर्थिक शिस्त आणि संयम हेच त्यासाठी महत्त्वाचे असतात.”
‘बर्कशायर’ची वार्षिक सभा म्हणजे केवळ आर्थिक आढावा घेणारी बैठक नव्हती. ती एक शेअर बाजार विद्यापीठाचा तो एक विशेष वर्ग असत. हजारो गुंतवणूकदार ओमाहा शहरात एकत्र यायचे आणि बफे-मंगर जोडीचे प्रश्नोत्तर सत्र रंगायचे. यातून अनेकांना शेअर बाजाराबद्दल नवनवे दृष्टिकोन मिळत असत. त्यांनी यशाची व्याख्या पैसे कमवण्यात केली नाही, तर विश्वास संपादन करण्यात केली. म्हणूनच बफे यांचा वारसा केवळ ‘बर्कशायर’च्या ताळेबंदावर नव्हे, तर लाखो छोट्या गुंतवणूकदारांच्या मनात कायम राहिला आहे. वॉरेन बफे यांच्या निवृत्तीनंतर ग्रेग अॅबेल हे ‘बर्कशायर हॅथवे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी होतील. गेल्या काही वर्षांत बफे यांनी अॅबेल यांना हळूहळू निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतले होते. अॅबेल हे त्यांचे ऊर्जा क्षेत्रातले सखोल ज्ञान, सामंजस्यपूर्ण नेतृत्वशैली आणि कमी बोलत जास्तीत जास्त काम करून दाखवणे, या गुणांसाठी विशेषत्वाने ओळखले जातात. बफे यांनी स्वतः एकदा म्हटले होते, “आज रात्री मला काही झाले, तर उद्या सकाळी ग्रेग एकही क्षण न चुकता संपूर्ण जबाबदारी घेईल.” त्यांनी सार्वजनिकपणे हे विधान करतानाच, अॅबेल यांच्यावर त्यांचा किती दृढ विश्वास आहे, हे दाखवून दिले होते आणि आता आपल्या स्वतःच्या विधानाप्रमाणेच, त्यांनी आपल्या अब्जावधी डॉलर्सच्या साम्राज्याची सारी सूत्रे त्यांच्या हाती सोपवली आहेत.
बफे यांची निवृत्ती म्हणजे केवळ एका सीईओची निवृत्ती नाही, तर ती एका दृष्टिकोनाची निवृत्ती आहे. शेअर बाजारातील अनिश्चितता, हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निर्णयप्रणाली आणि क्रिप्टोकरन्सीच्या नशेत भरकटलेल्या नव्या गुंतवणूकदारांसाठी बफे हे संयम आणि विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाचे आदर्श असे उदाहरण होते. त्यांनी स्वतः कधी क्रिप्टो गुंतवणुकीत शिरकाव केला नाही. कारण त्यांच्या मते, “तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल, तर त्यात गुंतवणूक करू नका,” असे त्यांचे साधे सरळ तत्त्वज्ञान होते. हे तत्त्व सर्वांत मोलाचे असेच आहे. त्यांचे हे म्हणणे आजही लागू पडते. जेव्हा गुंतवणुकीपेक्षा सट्टा मोठा होतो, तेव्हा आर्थिक संकटांची शक्यता वाढते, हे वेळोवेळी दिसून आले आहे. बफे यांनी त्यांच्याकडे असलेल्या अब्जावधी डॉलर्सपैकी 99 टक्के संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘बिल गेट्स फाऊंडेशन’ आणि इतर संस्थांमार्फत त्यांनी लाखो कुटुंबांच्या जीवनात बदल घडवून आणला. हीच त्यांची खरी संपत्ती आहे, असे नक्कीच म्हणता येते. “मला अशा प्रकारे समाजाची परतफेड करायची आहे की, त्यातून लोकांना मदतही होईल आणि स्मारकेही उभारली जाणार नाहीत,” असे त्यांनी फार पूर्वीच म्हटले होते. भारतातील गुंतवणूकदार अजूनही जलद मिळणारा नफा, टिप्स आणि शॉर्टकटच्या मोहात असलेले दिसून येतात. अशा परिस्थितीत बफे यांच्यासारखी शिस्तबद्ध, दीर्घकालीन आणि मूल्याधारित गुंतवणूक ही आदर्श ठरू शकते. ‘एसआयपी’, ‘म्युच्युअल फंड्स’ आणि ‘दीर्घकालीन इक्विटी’ या क्षेत्रात गुंतवणूक करताना बफे यांच्या तत्त्वांचे अनुकरण केल्यास आपल्यालाही फायदेशीर व दीर्घकालीन परतावा नक्कीच मिळू शकतो. वॉरेन बफे यांनी आपल्या कामगिरीने सिद्ध केले की, आर्थिक यश हे केवळ झपाट्याने धनसंचयाने नव्हे, तर योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य तत्त्वांवर आधारित निर्णय घेण्यानेच साधता येते. त्यांच्या निवृत्तीनंतर ‘बर्कशायर’ची वाटचाल ग्रेग अॅबेल यांच्याखाली कशी घडते, याकडे जगाचे लक्ष राहीलच. मात्र, त्याही पलीकडे बफे यांचा वारसा हा आर्थिक कमाईच्याही पलीकडचा आहे. त्यांनी वारसा दिला आहे तो धैर्य, संयम, पारदर्शकता आणि विवेकी नेतृत्वाचा!
संजीव ओक