मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Victims Family on Operation Sindoor) पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात हिंदूंना टार्गेट करून मारण्यात आले. आधी त्यांची ओळखपत्रे मागितली गेली, नंतर ते हिंदू आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यांचे कपडेही काढण्यात आले. या क्रुर हल्ल्याचा बदला जशास तसे उत्तर देऊन घेणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. त्यानुसार बुधवार, दि. ०७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर' द्वारे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेले ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
हे वाचलंत का? : एकीला बालवयातच उंच भरारी घेण्याची इच्छा, दुसरी वयाच्या १७ व्या वर्षीच सैन्यात भरती
पहलगाम हल्यात मारले गेलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे म्हणाल्या की, ज्या मुलींच्या कपाळावर सिंदूर लावले होते त्यांच्यासाठी हा एक परिपूर्ण बदला आहे. ऑपरेशनचे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी यासाठी सरकारचे आभार मानले. संतोष यांची मुलगी आसावरी जगदाळे हिने सांगितले की, तिला ऑपरेशन सिंदूरबद्दल वृत्तवाहिन्यांद्वारे कळले. ती म्हणाली, "मिशनचे नाव ऐकून मी खूप रडत होते. मला आठवते जेव्हा हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला आले होते तेव्हा सर्वजण म्हणाले होते की आम्ही भारताच्या बहिणी आहोत, कदाचित याच कारणामुळे या मोहिमेला असे नाव देण्यात आले आहे. मला वाटते की त्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्व लोकांचा बदला घेण्यात आला आहे. मी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते."
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता म्हणाल्या, "पंतप्रधान मोदींनी या मिशनला सिंदूर असे नाव देऊन महिलांचा सन्मान केला आहे. हल्ल्याचा दिवस आठवून मला अजूनही रडू येते. पंतप्रधान मोदी काय कारवाई करतात याची आम्ही वाट पाहत होतो आणि त्यांनी योग्य उत्तर दिले आहे. दहशतवाद्यांचा पूर्णपणे नायनाट झाला पाहिजे." कानपूरमधील शुभम द्विवेदीची पत्नी ऐशान्या म्हणाली, "माझ्या पतीचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आभारी आहे. संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी आमचा विश्वास जिवंत ठेवला आहे. माझ्या पतीला आज खरी श्रद्धांजली मिळाली आहे. ते कुठेही असले तरी आज त्यांना शांती मिळाली असेल."
कर्नाटकातील मंजुनाथचीही इस्लामिक दहशतवाद्यांनी हत्या केली होती. ते कर्नाटकातील शिवमोग्गा येथील रहिवासी होते. मंजुनाथ राव यांच्या आई सुमती म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूर हे या मोहिमेसाठी सर्वोत्तम नाव आहे. आम्हाला आशा होती की पंतप्रधान मोदी आमच्या मुलांच्या मृत्यूवर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देतील आणि त्यानुसार त्यांनी त्यावर चांगली कारवाई केली आहे. हा हल्ला बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, सवाई कॅम्प, बिलाल कॅम्प, कोटाली कॅम्प, बर्नाला कॅम्प, सरजल कॅम्प आणि महमूना कॅम्पवर करण्यात आला. या हल्ल्यात ८० हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.