स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची कोकण आयुक्त कार्यालयात बैठक
07-May-2025
Total Views |
मुंबई : ( Self-Redevelopment Study Group meets at Konkan Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे.
नुकतीच या अभ्यासगटाची पहिली बैठक वांद्रे येथे पार पडली होती. आता उद्या गुरुवार, ०८ मे रोजी दुपारी ३ वाजता या अभ्यासगटाची दुसरी बैठक सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.
या बैठकीत ठाणे, नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर महानगरपालिकांनी १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील विविध मुद्द्यांच्या केलेल्या पूर्ततेबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकीला अभ्यास गटाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्यासह विधान परिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, नवी मुंबईचे आमदार प्रशांत ठाकूर, वसई (पालघर) च्या आमदार स्नेहा दुबे, ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष, नवीमुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष, नगरपालिका-महापालिकांचे आयुक्त बैठकीस उपस्थित राहणार आहेत.